खिरोदा येथून गावठी कट्टा व जीवंत काडतुसांसह दोघे अटकेत

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी | येथून जवळच असलेल्या खिरोदा येथे आयजी नाशिक यांचे पथक आणि सावदा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत गावठी कट्टा आणि जीवंत काडतुसांसह दोघांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

या संदर्भात वृत्त असे की, सावदा पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणार्‍या खिरोदा गावातल्या बसस्थानक परिसरातील एका हॉटेलच्या समोर दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जीवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. आय. जी. यांचे पथक व सावदा पोलीस यांचे तर्फे ही संयुक्त कार्यवाही करण्यात आली.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरिक्षकांच्या पथकाला या संदर्भातील गुप्त माहिती मिळाली होती. या अनुषंगाने पथकातील ए. एस. आय. बशीर तडवी व हे कॉ राजेंद्र बोरसे यांनी सावदा पोलीस स्टेशनला याबाबतची माहिती दिली. यानुसार आयजींचे पथक आणि ए. पी. आय. देविदास इंगोले, पी.एस.आय. राजेंद्र पवार व समाधान गायकवाड, पो.हे.कॉ. मनोज हिरोळे, संजय चौधरी, ममता तडवी, यशवंत टहाकळे यांच्यासह सहकार्‍यांनी आज दुपारी ही कार्यवाही केली.

या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडील गावठी कट्टा आणि जीवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा याबाबत सावदा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content