विकासकामांमध्ये कोणताही भेद असता कामा नये : पालकमंत्री (Video)

सावदा, ता. रावेर, प्रतिनिधी | प्रत्येकाने धर्माभिमानी असावे, एक हिंदू म्हणून मला माझ्या धर्माचा नक्कीच अभिमान आहे. मात्र याचा अर्थ इतर धर्मियांची कामे करू नये असा होत नाही. मी धरणगावातून मुस्लीम समाजाच्या कार्यर्त्याला लोकनियुक्त नगराध्यक्ष केले. तर, बुध्द धर्मिय सदस्याला पंचायत समितीचे सभापतीपद खुले असतांनाही सभापती केले. विकासकामांमध्ये कोणताही भेद असता कामा नये. माझ्या आजवरच्या वाटचालीत हा भेद आपण कधीही मानला नसल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. सावदा येथील खंडेराव देवस्थानाच्या सभामंडपाचे भूमिपुजन केल्यानंतर आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते खंडेराव देवस्थानाच्या सभा मंडपाचे भूमिपुजन करण्यात आले. प्रारंभी देवस्थानातर्फे आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मंदिरात पूजन झाल्यानंतर कुदळ मारून कामास प्रारंभ करण्यात आला. यानंतर कामाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मनोगतातून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासाला दोन वर्षांपासून गती मिळाल्याचे सांगितले. खंडेराव देवस्थानाच्या सभा मंडपासाठी नियोजन मंडळाचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी सूचित केल्यानुसार आपण जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत याचा विषय मांडला असता पालकमंत्र्यांनी तात्काळ याला मंजुरी दिली. यासोबत सावदा येथे ७५ लाख रूपयांच्या पाण्याच्या टाकीच्या कामालाही मंजुरी मिळाली असून याचे काम लवकर सुरू होणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, लहानपणी माझे काका येथे पीएसआय असल्याने दोन वर्षे मी सावद्यात राहिलेलो आहे. बालपणी या मंदिरावर आपण आईसोबत नेहमी येत असल्याचे आठवण त्यांनी आवर्जून सांगितली. लोकप्रतिनिधी अनेक कामे करत असतात. मात्र कामे होतात, आणि विस्मरणात जातात. मात्र देवस्थानाची केलेली कामे प्रदीर्घ काळापर्यंत स्मरणात राहतात. या अनुषंगाने या देवस्थानात नगरोत्थान योजनेतून प्रस्ताव मिळाल्यास तातडीने ५० लाखांपर्यंतचा निधी मंजूर करता येईल असे पालकमंत्री म्हणाले. जनता ही गटर, वॉटर आणि मीटरशी जुडलेली असते. या बाबी लोकांना महत्वाच्या असतात. पाणंद रस्ते, जिल्हा परिषदेच्या शाळांना वॉल कंपाऊंड आदी महत्वाचे प्रकल्प आपण राबविले आहेत. सावदा येथील शादिखान्यासाठी ९० लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असून याचे काम लवकरच सुरू होणार आहेत. तर नगराध्यक्षांनी तातडीने प्रस्ताव दिल्यास विकासकामांना निधी प्रदान करण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी याप्रसंगी दिली.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, आपल्याला आमदारकी आणि नंतर मंत्रीपद मिळाले तरी आपण कधीही बडेजाव मिरवत नाही. कधी पदांची हवा आपल्या डोक्यात जाईल असे वागत नाही. आपल्या समाजाची मते कमी असतांनाही मतदारसंघातील जनता आपल्या फक्त आणि फक्त कामांच्या बळावर निवडून देत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तर आमदार चंद्रकांत पाटील हे मतदारसंघात चांगली कामे करत असून विशेष करून बोदवडमधील जनतेची तहान भागविण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांने आपले पाठबळ आहे. जिल्ह्याचा साडेचारशे कोटी रूपयांचा गल्ला हा जनतेमुळे आपल्या हातात असून याच्या माध्यमातून आपण जनहितासाठी कटीबध्द असल्याचे पालकमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री आ. चंद्रकांत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, नगराध्यक्षा अनिता येवेले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, राष्ट्रवादीचे गटनेते फिरोजखान पठाण, शिवसेनेचे तालुकाप्रमुख योगीराज पाटील, ज्ञानेश्वर महाजन, स्वामीनारायण मंदिराचे कोठारी डीपी स्वामी ,शिवसेना उपतालुका प्रमुख धनंजय चौधरी, नगरसेवक किशोर बेंडाळे, मंदिराचे पुजारी अशोक भगत, माजी नगराध्यक्षा सौ हेमांगी चौधरी, राहुल पवार, माजी नगरसेवक रवींद्र बेंडाळे, मोहनदान भंगाळे, नोमदास भंगाळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

खालील व्हिडीओत पहा सभामंडप कामाचे उदघाटन

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1052527982232735

Protected Content