रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील रमजीपुर ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकासकामांबाबत गंभीर शंका उपस्थित करत ग्रामपंचायत सदस्यांनी थेट चौकशीची मागणी केल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. २०२१/२२ तसेच २०२५/२६ या कालावधीत झालेल्या कामांची सखोल चौकशी करण्यासाठी गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
रमजीपुर येथील ग्रामस्थ आशिष धनगर यांनी गट विकास अधिकारी विनोद मेढे यांना दिलेल्या निवेदनात अनेक गंभीर आरोप मांडले आहेत. वार्ड क्रमांक तीनमधील वडिलोपार्जित जागेवर अतिक्रमण झाल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला असून, ही जागा ग्रामपंचायतीने परस्पर इतरांना दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संबंधित कुटुंबामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. २०२१/२२ आणि २०२५/२६ या आर्थिक वर्षांमध्ये मंजूर व पूर्ण झालेल्या कामांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या मते, कामांच्या अंमलबजावणीत पारदर्शकतेचा अभाव दिसून येत असून, याबाबत अधिकृत तपास होणे गरजेचे आहे.
याशिवाय गावातील कचरा व्यवस्थापनासाठी असलेली कचरा गाडी देखील गायब झाल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. या घटनेमुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित जबाबदारांवर कारवाईची मागणी होत आहे.
या निवेदनावेळी ग्रामपंचायत सदस्य घनश्याम कावडकर आणि आशिष धनगर उपस्थित होते. ग्रामस्थांनी प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.



