वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील श्री आ.गं हायस्कूल व नामदेवराव गोमाजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषीक वितरण सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी कैलास कडलग तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी किशोर चव्हाण आणि एपीआय जालिंदर पळे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र श्रीकांत चौधरी, मनोजकुमार वसंतराव पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परीक्षित शरद वाणी व पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दुर्गादास धांडे, सेवानिवृत्त शिक्षक अनिल मदन वाणी, आप्पा वाणी यांची उपस्थिती होती.

दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाल्यानंतर मान्यवरांचे स्वागत प्राचार्य सी.सी.सपकाळे व पर्यवेक्षक जे.व्ही. तायडे यांनी केली.अध्यक्षीय मनोगतात प्रांताधिकारी कैलास कडलक यांनी विद्यार्थ्यांना कॉपीचे दुष्परिणाम काय होतात यासंदर्भात गंभीर इशारा दिला. आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचे असेल तर शरीर सुदृढ असले पाहिजे असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अध्यक्षीय मनोगतातून दिला.
मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना पारितोषिकाचे मूल्य समजावून सांगितले .पारितोषिक एक रुपयाचे असो वा एक लाखाचे त्या दोघांचे मूल्य व त्या मागच्या भावना या समान असतात पारितोषिकाचे मूल्य त्याच्या किमतीवरून करू नये. असे विचार त्यांनी प्रकट केले. एपीआय जालिंदर पळे यांनी आपल्या मनोगतामध्ये नगरपालिकेच्या व जिल्हा परिषदांच्या शाळा इतर शाळेच्या तुलनेत कुठेही कमी नाही. उलट पक्षी या शाळांच्या,आपल्या मराठी शाळांच्या शिक्षक वर्गाकडे अनुभव संपन्नता जास्त असते त्यामुळे ते विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त देत असतात. असे विचार त्यांनी प्रकट केले .
यानंतर पारितोषिक वितरण पार पडले .इयत्ता दहावी इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्राविण्य व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. त्याचप्रमाणे वर्षभरामध्ये विविध शालेय उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना दानशूर दात्यांनी ठेवलेल्या अनामत रकमेच्या व्याजातून हे पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे विविध उपक्रमांविषयी संजय महाजन यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नंदू पाटील यांनी केले. समारंभ संपन्न झाल्यानंतर इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना त्याच सभामंडपात निरोप देण्यात आला. व नंतर हा कार्यक्रम आटोपला.

Protected Content