राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर हजेरी; भाजपच्या नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांना नोटीसा

सावदा, ता. रावेर जितेंद्र कुलकर्णी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यक्रमातील व्यासपीठावर हजेरी लावल्याने येथील भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आणि नऊ नगरसेवकांना भाजपने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

याबाबत वृत्त असे की, २०१६ साली झालेल्या नगरपालिका निवडणुकीत येथे भाजपच्या तिकिटावर अनिता पंकज येवले या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी तर अन्य नऊ जण नगरसेवक म्हणून निवडून आले होते. हे सर्व जळ एकनाथराव खडसे यांचे समर्थक होते. गेल्या वर्षाच्या अखेरीस खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला असला तरी तांत्रीक दृष्ट्या काहीही अडचण नको म्हणून नगराध्यक्षा आणि नगरसेवकांनी पक्षांतर केले नाही.

तथापि, काही दिवसांपूर्वी सावदा शहरात झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्याला लोकनियुक्त नगराध्यक्षा अनिता पंकज येवले यांच्यासह नऊ नगरसेवकांनी उपस्थिती लावली. याची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा देखील झाली.

या प्रकाराची आता भारतीय जनता पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. पक्षाचे तालुकाध्यक्ष राजन लासूरकर यांनी अनिता पंकज येवले यांच्यासह नऊ नगरसेवकांना या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सात दिवसांच्या आत या नोटीसला उत्तर देण्याचे नमूद करण्यात आले आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांच्या निर्देशानुसार ही नोटीस बजावण्यात आली असून याला उत्तर न दिल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा यात देण्यात आलेला आहे.

Protected Content