सावदा, ता. रावेर-जितेंद्र कुलकर्णी (स्पेशल रिपोर्ट ) | केळी उत्पादकांची मोठी पिळवणूक सुरू असताचा आरोप शेतकरी आणि व्यापार्यांनी कालच केला असतांना रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, सावदा रेल्वे स्थानकावरून केळीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून यामुळे रेल्वे प्रशासनाला मोठे उत्पन्न देखील मिळते. आधी वाहतूक वेळेवर होत असे. मात्र सुमारे दोन वर्षांपासून यात अनियमितता आली आहे. यामुळे सकाळी रेल्वेची मालगाडी येणार असल्याचे जाहीर केल्यानंतर ही ट्रेन सायंकाळी येऊन रात्री उशीरापर्यंत यात केळी लोड केली जात असल्याने शेतकरी आणि व्यापारी जेरीस आले आहेत. या संदर्भात काल सायंकाळी फळ बागायतदार संघटनेचे सदस्य आणि व्यापार्यांनी पत्रकारांसमोर आपली व्यथा मांडली होती. मात्र रेल्वेचे प्रशासन इतके निगरगट्ट आहे की, याची कोणतीही दखल न घेता त्यांनी ताठरपणा कायम ठेवल्याचे पुन्हा दिसून आले आहे.
सावदा रेल्वे स्थानकावर काल सकाळी घोषणा केलेली मालवाहू गाडी सायंकाळी आली. रात्री बारा वाजता गाडीत पूर्ण डब्यांमध्ये केळी भरण्यात आली. रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी तसा रिपोर्ट देखील देण्यात आला. नियमानुसार तीन तासांमध्ये म्हणजे रात्री तीन वाजता ही मालगाडी सावदा रेल्वे स्थानकातून निघणे अपेक्षित होते. बरं, थोडा विलंब झाला तरी आपण समजू शकतो. मात्र तब्बल साडे सात तास निघून गेल्यानंतरही म्हणजे सकाळी साडेदहा वाजेपर्यंत या गाडीचा ड्रायव्हरच पोहचला नसल्याने केळीचे रॅक असणारी मालगाडी ही सावदा रेल्वे स्थानकावर जशीच्या तशी पडून असल्याचे दिसून आले. केळी हा नाशवंत पदार्थ असून अगदी काही तासांचा विलंब झाल्यास ते पिकून गेल्याने भाव कमी मिळतो. जर, या गाडीतील केळी पिकून गेल्याने शेतकर्यांचे लाखोंचे नुकसान झाले तर याचा दोष कुणाचा ? रेल्वे याची भरपाई करून देणार का ? असे प्रश्न आता विचारण्यात येत आहेत.
या संदर्भात सावदा रेल्वे स्थानकावरील गुप्ता नामक अधिकार्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने संवाद साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. तर गाडी अजून उभीच असल्याची माहिती मिळताच शेतकरी आणि व्यापार्यांनी रेल्वे स्थानकाकडे धाव घेतल्याचे वृत्त आहे. रेल्वेच्या या भोंगळ कारभारामुळे केळी उत्पादक संतापले आहेत.