जय हो : सावदेकर अतुल राणे बनले ब्राम्होस मिसाईल प्रकल्पाचे प्रमुख !

सावदा, ता. रावेर, जितेंद्र कुलकर्णी | येथील मूळ रहिवासी असणारे अतुल दिनकर राणे यांच्याकडे ब्रम्होस एयरोस्पेसचे डायरेक्टर जनरल या पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. या माध्यमातून ब्रम्होस सुपरसॉनिक मिसाईल प्रोग्रॅमचे ते प्रमुख बनले असून ही सावदेकरांसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानाची बाब मानली जात आहे. पहा या संदर्भातील लाईव्ह ट्रेंडस न्यूजचा एक्सक्लुझीव्ह वृत्तांत.

अतुल दिनकर राणे यांनी सोमवारी डीआरडीओ म्हणजेच डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत येणार्‍या ब्राम्होस एयरोस्पेसच्या डायरेक्टर जनरल अर्थात डीजी या पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. या माध्यमातून ते ब्राम्होस एयरोस्पेसचे सीईओ आणि एमडी अर्थात अनुक्रमे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक बनले आहेत. ही संस्था भारत आणि रशिया यांच्या संयुक्त सहकार्याने विकसित करण्यात आलेली आहे. याच संस्थेने ब्राम्होस हे मिसाईल तयार केले असून भारताच्या संरक्षण यंत्रणेतील ते अतिशय महत्वाचे आयुध मानले जात आहे.

अतुल दिनकर राणे हे मूळचे सावदा (ता. रावेर) येथील रहिवासी होत. त्यांनी पुणे विद्यापीठातून अभियांत्रीकीची पदवी संपादन केल्यानंतर १९८७ साली डीआरडीओ या संस्थेत आपल्या कारकिर्दीस प्रारंभ केला. डीआरडीओच्या मिसाईल प्रोग्रॅममध्ये त्यांनी अतिशय मोलाची भूमिका पार पाडली. यात प्रामुख्याने संगणकीय विभागातील विविध प्रणाली विकसित करण्यासाठी त्यांने प्रयत्न कारणीभूत ठरले. पृष्ठभागावरून हवेत मारा करणार्‍या आकाश या मिसाईलमधील संगणकीय यंत्रणा विकसित करणार्‍या चमूमध्ये त्यांचा समावेश होता. तर, अग्नी-१ या मिसाईलच्या ऑनबोर्ड मिशन सॉप्टवेअरला त्यांनीच डेव्हलप केले होते. यानंतर १९९८ साली भारत आणि रशिया सरकारच्या संयुक्त उपक्रमातून उभारण्यात आलेल्या ब्राम्होस एयरोस्पेस या विभागात त्यांनी कार्य सुरू केले. तेव्हापासून ते याच मिशनवर काम करत आहेत. या विभागाने ब्राम्होस हे मिसाईल तयार केले असून ते आज भूदल, नौदल आणि हवाईदल अर्थात तिन्ही दलांमध्ये तैनात करण्यात आलेले आहे.

दरम्यान, काळात अतुल दिनकर राणे यांनी रशियातील भारतीय दुतावासात देखील काही काळ काम केले. तर ब्राम्होस एयरोस्पेसच्या विविध प्रकल्पांमध्ये त्यांनी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडली. गेल्या काही वर्षांपासून ते ब्राम्होस एयरोस्पेसचे संचालक अर्थात डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. आता त्यांच्याकडे डायरेक्टर जनरल ही सर्वोच्च जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अर्थात, आता ब्राम्होस या संपूर्ण मिसाईल प्रकल्पाचे प्रमुख म्हणून आपले खान्देशवासी अतुल दिनकर राणे यांनी सूत्रे सांभाळली आहेत. विशेष बाब म्हणजे त्यांचे वडिल दिनकर राणे हे देखील इस्त्रोमध्ये कार्यरत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे केरळमध्ये झाले असून उच्च शिक्षण पुणे विद्यापीठात झालेले आहे.

ब्राम्होस हे भारतीय सैन्य दलातील ब्रम्हास्त्र म्हणून गणले जाते. याचे नाव भारतीय नदी ब्रम्हपुत्रा आणि रशियन नदी मोस्कवा यांच्या नावाला एकत्रीत करून देण्यात आलेले आहे. हे मध्यम पल्ल्याचे मिसाईल असून ते सुपर सॉनिक अर्थात ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त गतीने आगेकूच करून आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेते. यात अतिशय अद्ययावत अशी नेव्हगेशन प्रणाली प्रदान करण्यात आलेली आहे. यामुळे ते लक्ष्यापर्यंत अचूकपणे पोहचते. याची रेंज सुमारे तीनशे किलोमीटर असून ते पाणबुडी, लढाऊ विमान, जहाज आणि भूदलातील वाहनांवर इन्स्टॉल करण्याची सुविधा आहे. आता याची दुसरी आवृत्ती म्हणजेच ब्राम्होस-२ या मिसाईलला विकसित करण्यात येत आहे. अतुल दिनकर राणे यांच्या कार्यकाळात त्याची यशस्वी चाचणी होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Protected Content