महाराष्ट्राचा पॅटर्न राष्ट्रीय पातळीवर व्हावा-राऊत

मुंबई प्रतिनिधी । ममता बॅनर्जी यांच्या विरोधकांच्या एकीकरणाच्या आवाहनाला प्रतिसाद देतांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात जसे घडले तसेच राष्ट्रीय पातळीवर व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राने देशाला नवी दिशा दाखवली आहे. नवा मार्ग दाखवला आहे. राष्ट्रीय स्तरावरही तेच झालं पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ममता बॅनर्जी यांनी देशातील सर्व विरोधकांना एक पत्र लिहिलं आहे. एकूण 27 नेत्यांना त्यांनी पत्रं लिहिलं आहे. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र विकास आघाडी हा एक प्रयोग देशाच्या राजकारणात झाला आहे. हे संपूर्ण भाजपने शिकावे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे भिन्न विचाराचे पक्ष गेल्या अनेक दिवसांपासून सरकार चालवत आहे. हे आदर्श सरकार आहे असं मी मानतो. अशा प्रकारची आघाडी यूपीएकडून करण्यात यावी. ममता बॅनर्जी यांनी जवळ जवळ तशाच प्रकारच्या सूचना केल्या आहेत. महाराष्ट्राने नवी दिशा दाखवली आहे. ते राष्ट्रीय स्तरावर झालं पाहिजे, असं ते म्हणाले. सर्वांनी आता एकत्रं आलं पाहिजे. या संदर्भात सर्वांनी एकत्र बसायला हवं. चर्चा करायला हवी. मला वाटतं सर्व एकत्र येतील, असं राऊत म्हणाले.

Protected Content