Home करियर जळगावच्या संगीता पाटील यांची कॅट वुमन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड 

जळगावच्या संगीता पाटील यांची कॅट वुमन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावसाठी अभिमानास्पद ठरणारी मोठी घडामोड घडली असून कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या देशातील प्रभावशाली व्यापारी संघटनेच्या महिला विभाग अर्थात कॅट वुमन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जळगावच्या संगीता पाटील यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर मुख्य राष्ट्रीय कार्यकारिणीच्या राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदाचीही जबाबदारी सोपविण्यात आल्याने कॅटच्या इतिहासात प्रथमच एका व्यक्तीकडे राष्ट्रीय स्तरावरील दोन महत्त्वपूर्ण पदांची धुरा देण्यात आल्याची ऐतिहासिक नोंद झाली आहे.

नवी दिल्ली येथील हिंदी भवनमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय महिला उद्योजक शिखर परिषदेत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या उपस्थितीत या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली. कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि महामंत्री तसेच खासदार प्रविण खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या परिषदेत देशभरातील ४०० हून अधिक महिला उद्योजक सहभागी झाल्या होत्या. या राष्ट्रीय व्यासपीठावर जळगावच्या संगीता पाटील यांची झालेली निवड महाराष्ट्रासाठीही विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

देशातील कोट्यवधी व्यापारी आणि ४० हजारांहून अधिक व्यापारी संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कॅटसारख्या प्रभावी संघटनेत दुहेरी जबाबदारी मिळणे हे संगीता पाटील यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर झालेला गौरव मानला जात आहे. महिला उद्योजकता, व्यापारवृद्धी, कौशल्य विकास आणि स्वावलंबनाच्या दिशेने त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत हा सन्मान मिळाल्याचे बोलले जात आहे.

परिषदेत मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी महिला उद्योजकतेचे महत्त्व अधोरेखित करत देशाच्या आर्थिक विकासात महिलांची भूमिका निर्णायक असल्याचे सांगितले. शासनाच्या विविध योजना आणि अशा मंचांमुळे महिलांना दिशा, नेटवर्क आणि बाजारपेठ उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले. परिषदेत महिला उद्योजकता, फायनान्स, स्किल डेव्हलपमेंट, डिजिटल सक्षमता, एमएसएमई क्षेत्रातील संधी आणि स्टार्टअप्स या विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.

संगीता पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महिला उद्योजकतेला सक्षम नेटवर्क देण्याचा निर्धार व्यक्त केला. महिलांमध्ये क्षमता आणि जिद्दीची कमतरता नसून त्यांना योग्य संधी आणि व्यासपीठाची गरज असल्याचे सांगत कॅट वुमन विंग देशभरातील महिला उद्योजकांना एकत्र आणून सशक्त आणि प्रभावी संघटन उभारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनांना अधिक गती देण्यासाठी महिलांनी उद्योग-व्यवसायात नेतृत्व स्वीकारावे, असे आवाहनही त्यांनी केले. डिजिटल सक्षमता, कौशल्य विकास आणि मार्केट लिंकजच्या माध्यमातून महिलांना लोकल ते ग्लोबल बाजारपेठेशी जोडण्यावर विशेष भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

परिषदेदरम्यान प्रविण खंडेलवाल यांनी संगीता पाटील यांच्या नावाची राष्ट्रीय अध्यक्षपदी घोषणा केली. त्यानंतर त्यांनी कॅट वुमन विंगची नवीन संघटनात्मक रचना जाहीर करत २५ सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणी तसेच १५ विभागीय समन्वयकांची नियुक्ती केली. या नव्या नेतृत्वामुळे देशातील महिला उद्योजकतेला नवे बळ आणि नवचैतन्य मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

जळगाव जिल्ह्यापासून राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत संगीता पाटील यांनी केलेला प्रवास उल्लेखनीय मानला जातो. विविध संस्थांमध्ये पदाधिकाऱ्याच्या भूमिकेत त्यांनी समाजाभिमुख आणि परिणामकारक कामाचा ठसा उमटवला असून या नियुक्तीमुळे त्यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे.

दोन दिवसीय परिषद यशस्वी करण्यासाठी कॅट वुमन विंग आणि कॅट दिल्ली कार्यालयाच्या टीमने घेतलेले परिश्रमही यावेळी अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला उद्योजकतेच्या राष्ट्रीय चळवळीला नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त झाली.


Protected Content

Play sound