जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वाढत्या तापमानामुळे जळगावसह देशभरात उष्णतेची तीव्र लाट नागरिकांसाठी आरोग्य आणीबाणीचे रूप धारण करत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांनी तातडीने व्यापक उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचा मुद्दा पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी पुढे आणला आहे. मानवी जीवितासोबतच पशू-पक्ष्यांच्या संरक्षणासाठीही तातडीच्या आणि परिणामकारक उपाययोजना राबवण्याचे आवाहन त्यांनी केले असून या संदर्भात प्रशासनासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना मांडल्या आहेत.
सध्या वाढत्या तापमानामागे निसर्गाचा समतोल बिघडवणाऱ्या विकासनीतीचा मोठा वाटा असल्याचे मत व्यक्त करत गाडगीळ यांनी उष्णतेच्या लाटेला केवळ हवामानाचा प्रश्न न मानता आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने पाहण्याची गरज अधोरेखित केली. या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य, कामकाजाची वेळ, नैसर्गिक थंडावा निर्मिती आणि पशू-पक्ष्यांचे संरक्षण अशा विविध अंगांनी उपाययोजना राबवण्याचा त्यांनी आग्रह धरला आहे.

वाहतूक व्यवस्थापनात शहरातील महत्त्वाच्या ट्रॅफिक सिग्नलवर ‘ग्रीन शेड नेट्स’ उभारून दुचाकीस्वारांना उन्हापासून संरक्षण देण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. दुपारी बारा ते चार या काळात ‘ग्रीन चॅनेल’ सिग्नल व्यवस्थेद्वारे प्रतीक्षा वेळ कमी करणे, स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्थापनाचा वापर करणे तसेच पत्र्याच्या बसथांब्यांवर उष्णतारोधक कोटिंग किंवा हिरव्या आच्छादनासह पिण्याच्या पाण्याची सोय करावी, असे त्यांनी सुचवले.
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने उष्माघाताच्या घटनांना प्रतिसाद देण्यासाठी फिरती आरोग्य पथके तैनात करणे, झोपडपट्ट्या व कामगार वस्त्यांमध्ये ‘ओआरएस’ पाकिटांचे मोफत वाटप आणि गर्दीच्या ठिकाणी पाणपोई सुरू करण्यावर त्यांनी भर दिला. उष्णतेच्या संकटात प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन निधीतून या उपायांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
महानगरपालिका, नगरपालिका व इतर शासकीय इमारती दुपारी नागरिकांसाठी ‘अर्बन शेल्टर’ म्हणून खुल्या ठेवाव्यात, जेणेकरून उन्हापासून बचावासाठी नागरिकांना सुरक्षित आसरा मिळू शकेल, अशी सूचनाही त्यांनी केली. तसेच बांधकाम मजुरांसाठी दुपारच्या वेळेत शारीरिक श्रमांवर बंदी, सकाळ-संध्याकाळ कामाचे विभाजन आणि कार्यालयीन वेळांमध्ये बदल करून सकाळी व रात्री कामकाज राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सुचवले.
नैसर्गिक थंडावा निर्माण करण्यासाठी मुख्य चौक, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणी सौरऊर्जेवर चालणारे कारंजे, मिस्ट फॉगर्स आणि वॉटर कर्टन्स उभारण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला. रस्त्याकडील झाडांवर प्रक्रिया केलेल्या पाण्याची फवारणी केल्यास परिसरातील तापमान कमी होण्यास मदत होऊ शकते, असा दावा त्यांनी केला.
मानवी संरक्षणासोबत पशू-पक्ष्यांच्या संरक्षणासाठीही व्यापक उपाययोजना सुचवताना शहरातील सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे उभारणे, त्यांची नियमित स्वच्छता ठेवणे आणि सावलीत पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. भटक्या प्राण्यांसाठी शहरभर पाण्याची कुंडे, दुकानदार व सोसायट्यांच्या सहभागातून ‘वॉटर पॉइंट्स’ उभारण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शहरालगतच्या जंगल भागातील नैसर्गिक तलाव आणि जलसाठे टँकरद्वारे भरून ठेवणे, वनविभागाच्या सहकार्याने कृत्रिम पाणीसाठे निर्माण करणे, गोशाळांमध्ये फॉगर्स बसविणे, ओला चारा व इलेक्ट्रोलाइट्सची उपलब्धता वाढविणे आणि पत्र्याच्या शेडचे तापमान नियंत्रणासाठी उपाय करणे, या उपाययोजनाही त्यांनी मांडल्या.
उष्माघाताने बाधित पक्षी आणि प्राण्यांसाठी २४ तास हेल्पलाइन क्रमांक जाहीर करणे, पशुवैद्यकीय डॉक्टरांची ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ तयार ठेवणे आणि जखमी पक्ष्यांच्या तातडीच्या उपचारासाठी मोबाइल क्लिनिक सुरू करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.



