जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अवैध वाळू वाहतुक करणार्या वाहनांवर कारवाई करुन जप्त केलेला वाळूचा ट्रक पळवून नेल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे.
महसूल प्रशासनाकडून वाळूची अवैध वाहतुक करणार्यांवर कारवाई करुन जप्त केलेले ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात जप्त केले जातात. याठिकाणी पोलीस मुख्यालयातील बाळू पाटील, अविनाश जाधव, गौरख पाटील व तुषार सोनवणे यांची गार्ड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, आज अर्थात मंगळवारी २३ रोजी बाळू पाटील व अविनाश जाधव हे ड्युटीवर असतांना दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास त्यांना गाडी सुरु होण्याचा आवाज आला. त्यांनी त्याठिकाणी जावून पाहिले असता, महसूलच्या पथकाने कारवाई करुन जप्त केलेला (एमएच १९ ५८०८) क्रमांकाचा ट्रक कोणीतरी घेवून गेला. घटनेची माहिती पोलिसानी महसूल पथकातील कर्मचार्याला दिली. त्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.