हुश्श.. अखेर दोन्ही बाळ मूळ मातांच्या कुशीत विसावली !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चुकीच्या सूचनेमुळे बाळांची अदलाबदल झाल्याच्या गैरसमज प्रकरणानंतर डीएनए अहवाल आल्याने मंगळवारी २३ मे रोजी रात्री ८ वाजता पडदा पडला. दोन्ही चिमुकले अखेर त्यांच्या मूळ आईच्या कुशीत विसावली. यावेळी दोन्ही माता या भावुक झाल्या होत्या.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २ मे रोजी दोन गरोदर महिलांना अत्यवस्थ झाल्यामुळे शस्त्रक्रियागृहामध्ये सिजर शस्त्रक्रिया करण्यासाठी घेण्यात आले होते. दोन्ही महिलांना झटके येऊन त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. या प्रकरणांमध्ये डॉक्टरांनी त्यांचे वैद्यकीय कौशल्य पणाला लावून दोन्ही मातांचे जीव वाचविले. मात्र त्याचवेळी दोन्ही मातांची बाळे ही गैरसमजुतीमुळे एकमेकांना देण्यात आली होती. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना समजावून ती बाळे मूळ मातांना दिली, मात्र बाळांचे पालक समाधानी नव्हते. त्यांनी डीएनए चाचणीची मागणी केली. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. त्यानुसार दोन्ही माता आणि बाळ यांचे डीएनए नमुने घेऊन नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल प्रलंबित होता.

अखेर हा बहुप्रतिक्षित अहवाल मंगळवार २३ मे रोजी संध्याकाळी रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाला. अनेक दिवसांपासून माता व बाळांची झालेली ताटातूट पाहता प्रशासनाने तात्काळ बाळ मूळ मातांना सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र दिवेकर व रुग्णालय प्रशासन यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही मातांना डीएनए अहवाल वाचून दाखविला. अहवालानुसार सुवर्णा उमेश सोनवणे यांना मुलगी तर प्रतिभा प्रवीण भिल यांना मुलगाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोन्ही मातांना त्यांची बाळ सुपूर्द करण्यात आले. यावेळी दोन्ही मातांना आनंदाश्रू आले होते. या भावपूर्ण प्रसंगी उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. संजय बनसोडे, नवजात शिशु अतीदक्षता विभागाच्या इन्चार्ज डॉ. शैलजा चव्हाण, डॉ. अतुल गाजरे, डॉ. मिताली गोलेच्छा, डॉ. शुभांगी चौधरी यांच्यासह डॉ. विनेश पावरा, डॉ. श्रद्धा राणे, डॉ. संजीवनी अनेराय, नवजात शिशु विभागाच्या परिचारिका पूजा आहूजा, स्त्रीरोग विभागाच्या कक्ष क्रमांक सहाच्या परिचारिका चारुशिला पाटील याप्रसंगी उपस्थित होते.

Protected Content