Home Cities जळगाव मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत बीएलओंच्या योगदानाला सलाम – डॉ. नितू पाटील

मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत बीएलओंच्या योगदानाला सलाम – डॉ. नितू पाटील

0
13

वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण (SIR) उपक्रमांतर्गत देशभरासह महाराष्ट्रातही बूथ सक्षमीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) म्हणून कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची दखल घेत त्यांना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “माझा बीएलओ, माझा अभिमान” या संकल्पनेतून बीएलओंच्या राष्ट्रसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा विशेष लेख डॉ. नितू पाटील यांनी प्रसिद्ध केला आहे.

डॉ. नितू पाटील यांनी आपल्या अनुभवातून सांगितले की, बीएलओ म्हणून कार्यरत किशोर पोपट माचवे यांनी त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देत विशेष पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती संयमाने तपासली आणि आवश्यक अर्ज अचूकपणे भरून घेतले. या प्रक्रियेदरम्यान मतदारांची माहिती अद्ययावत करण्यासाठी किती बारकाईने काम करावे लागते, याची प्रत्यक्ष जाणीव झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. बीएलओंना प्रत्येक कुटुंबातील मतदारांचे नाव, जन्मतारीख, वय, पत्ता, नव्याने मतदार होणाऱ्या सदस्यांची माहिती तसेच इतर आवश्यक तपशील अत्यंत अचूकपणे नोंदवावे लागतात. प्रत्येक माहितीची कागदपत्रांच्या आधारे पडताळणी करून ती ऑनलाइन प्रणाली आणि अर्जामध्ये नोंदविताना एका अक्षराची किंवा अंकाची चूकही होऊ नये, याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे हे काम मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अत्यंत जबाबदारीचे असल्याचे लेखात नमूद करण्यात आले आहे.

नागरिकांनी बीएलओंचे काम सुलभ करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवावीत, कुटुंबातील मृत किंवा स्थलांतरित सदस्यांची अचूक माहिती द्यावी, तसेच सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या बीएलओंशी आदराने व सहकार्याची भूमिका ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. उन्हाळा, पावसाळा किंवा प्रतिकूल परिस्थितीतही घराघरांत जाऊन काम करणाऱ्या बीएलओंना माणुसकीच्या भावनेतून पाणी किंवा चहाची विचारपूस करणेही समाजाचे कर्तव्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. लेखात पुढे नमूद करण्यात आले आहे की, बहुतांश बीएलओ हे शिक्षक असून ते शाळेची जबाबदारी सांभाळत हे अतिरिक्त शासकीय कामही प्रामाणिकपणे पार पाडतात. त्यामुळे त्यांच्या कामाचा सन्मान करणे, त्यांना वेळेवर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणे आणि सकारात्मक प्रतिसाद देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे बीएलओंचा उत्साह वाढतो आणि मतदार यादी अधिक अचूक व पारदर्शक बनविण्यास मदत होते.

“कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही आणि कोणताही अपात्र व्यक्ती समाविष्ट होणार नाही” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासन आणि नागरिक या दोघांचेही योगदान तितकेच महत्त्वाचे असल्याचे लेखात अधोरेखित करण्यात आले आहे. “माझा बीएलओ, माझा अभिमान” हे केवळ घोषवाक्य नसून लोकशाही बळकट करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता असल्याचे डॉ. नितू पाटील यांनी म्हटले आहे.


Protected Content

Play sound