Home Cities जळगाव अखेर! संजय पवार यांच्या निवासस्थानी झळकले शरद पवारांच्या फोटोचे बॅनर

अखेर! संजय पवार यांच्या निवासस्थानी झळकले शरद पवारांच्या फोटोचे बॅनर

0
12

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या २२ जुलै रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे मोठे बॅनर झळकविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या बॅनरवर देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचा फोटोही प्रमुखत्वाने लावण्यात आला असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात या घडामोडीची चर्चा सुरू झाली आहे.

माहितीनुसार, ११ जून २०२६ रोजी संजय पवार यांनी देशाचे नेते शरदचंद्र पवार यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांचा फोटो लावण्यासाठी परवानगी देण्याची विनंती करणारे पत्र सादर केले होते. या पत्रावर शरदचंद्र पवार यांनी स्वतः “मान्यता” असा शेरा लिहून परवानगी दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

या मान्यतेनंतर संजय पवार यांनी आपल्या निवासस्थानी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, देशाचे नेते शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, कार्याध्यक्ष तथा खासदार प्रफुल पटेल, खानदेश प्रभारी व आमदार अनिल पाटील तसेच युवकांचे आशास्थान जय पवार यांचे छायाचित्र असलेले बॅनर लावले आहेत.

२२ जुलै रोजी अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी करण्याचा निर्धार करण्यात आला असून, या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन असल्याची माहिती देण्यात आली आहे. एकीकडे अजितदादा पवार यांच्या जयंतीची तयारी सुरू असताना, दुसरीकडे शरदचंद्र पवार यांच्या फोटोसह प्रमुख नेत्यांचे बॅनर झळकल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.


Protected Content

Play sound