Home Cities जळगाव जळगावचे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुनीलकुमार चोरडिया यांना पदोन्नती ; ‘सहाय्यक संचालक व...

जळगावचे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुनीलकुमार चोरडिया यांना पदोन्नती ; ‘सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता’ पदावर निवड

0
22

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून उल्लेखनीय सेवा बजावणारे सुनीलकुमार राजनकुमार चोरडिया यांची महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत ‘सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता (गट-अ)’ या पदावर पदोन्नतीसाठी निवड करण्यात आली आहे. शासनाने १४ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत शासन निर्णय जारी करत पसंतीक्रम मागविल्याने चोरडिया यांच्या निवडीचे विधी व न्याय क्षेत्रात स्वागत करण्यात येत आहे. जळगाव शहरातील जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक १ येथे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता (गट-अ) म्हणून कार्यरत असलेल्या सुनीलकुमार चोरडिया यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण आणि क्लिष्ट फौजदारी खटल्यांमध्ये शासनाची बाजू प्रभावी, अभ्यासपूर्ण आणि कायदेशीरदृष्ट्या भक्कमपणे मांडली आहे. त्यांच्या युक्तिवादाची शैली, कायद्यावरील प्रभुत्व आणि न्यायालयीन कामकाजातील शिस्तबद्धता यामुळे त्यांनी विधी क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

सुनीलकुमार चोरडिया हे दिवंगत राजनकुमार पन्नालाल चोरडिया (मामा) यांचे चिरंजीव असून, त्यांचे वडीलदेखील अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून उल्लेखनीय कार्य केले होते. चाळीसगाव तालुक्यातील वाघडी हे त्यांचे मूळ गाव असून त्यांनी आपल्या कौटुंबिक परंपरेला न्याय देत विधी क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाची, उत्कृष्ट सेवाभावाची आणि न्यायालयीन कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने त्यांची उच्च पदावर पदोन्नतीसाठी निवड केली आहे. शासनाच्या निर्णयानंतर जळगाव जिल्ह्यातील विधी क्षेत्र, न्यायालयीन अधिकारी, वकील, सहकारी तसेच विविध सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. सुनीलकुमार चोरडिया यांच्या पदोन्नतीमुळे जळगाव जिल्ह्याच्या विधी क्षेत्राचा गौरव वाढला असून, त्यांच्या अनुभवाचा लाभ राज्यातील न्याय व्यवस्थेला अधिक व्यापक पातळीवर मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound