जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खेडी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत ३५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रीतम संभाजी पाटील (वय ३५, रा. खेडी, कृष्ण मंदिराजवळ) असे मृत तरुणाचे नाव असून, अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार वाहनचालकाचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रीतम पाटील हे बुधवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीने खेडी परिसरातील हनुमान मंदिराजवळून जात होते. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रीतम पाटील हे मूळचे खेडी येथील रहिवासी असले तरी ते पत्नीसह नाशिक येथे वास्तव्यास होते. गेल्या पंधरा दिवसांपासून ते कामानिमित्त जळगाव येथे आले होते. बचत गटाशी संबंधित कामाची जबाबदारी ते सांभाळत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे.
या अपघातानंतर खेडी परिसरात शोककळा पसरली असून, नातेवाईक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे.



