Home Cities जळगाव रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटच्या अध्यक्षपदी संजय तापडिया विराजमान

रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटच्या अध्यक्षपदी संजय तापडिया विराजमान

0
10

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटचा पदग्रहण सोहळा मायादेवीनगर येथील रोटरी भवनात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी मावळते अध्यक्ष संदीप झवर यांनी नूतन अध्यक्ष संजय तापडिया यांच्याकडे, तर मावळते सचिव हरगोविंद मणियार यांनी नूतन सचिव धर्मेंद्र भय्या यांच्याकडे पदभार सुपूर्द केला.

या पदग्रहण सोहळ्याला रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे माजी गव्हर्नर डॉ. दीपक शिकारपूर आणि असिस्टंट गव्हर्नर अनिल कांकरिया यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विविध क्षेत्रातील मान्यवर, रोटरी सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. दीपक शिकारपूर यांनी जळगावमध्ये आयटीसोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रासाठीही पोषक वातावरण असल्याचे सांगितले. जळगावातील विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक आणि प्रतिष्ठित नागरिकांनी आपल्या शहरात शिक्षण, तंत्रज्ञान आणि सामाजिक विकासासाठी अधिकाधिक संधी निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच रोटरीच्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी आणि वंचित घटकांसाठी सेवाभाव व समर्पणाच्या भावनेने कार्य करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. सकारात्मक आणि समाजहिताची जाणीव असलेल्या व्यक्तींना रोटरी चळवळीत सहभागी करून संघटना अधिक सक्षम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

नूतन अध्यक्ष संजय तापडिया यांनी आपल्या मनोगतात आगामी वर्षात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, महिला सशक्तीकरण तसेच समाजोपयोगी विविध उपक्रमांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. सदस्यांच्या सहकार्याने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

असिस्टंट गव्हर्नर अनिल कांकरिया यांनीही नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा देत रोटरीच्या सेवाभावी कार्याचा विस्तार करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैजयंती पाध्ये यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत वारके यांनी मानले.


Protected Content

Play sound