भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर गुरूवारी १९ जून रोजी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने मोर्चा काढत निवेदन दिले. भुसावळ तालुक्यातील साकरी फाट्यावरील बियर बारला परवानगी थांबवण्याबाबत हे निवेदन होते. भुसावळ तालुक्यातील कंडारी शिवार, वॉर्ड क्रमांक ५ मधील नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते, ज्यात महिला आणि पुरुषांचा समावेश होता.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साकरी फाट्यावर नेहमी लोकांची वर्दळ असते. यामध्ये येणारे-जाणारे प्रवासी, विद्यार्थी, पालक, वयोवृद्ध व्यक्ती, दुकानदार आणि रेस्टॉरंटवाले यांची रात्री ९ वाजेपर्यंत मोठी गर्दी असते. तसेच रात्री जेवणानंतर शतपावली करणारे स्त्री-पुरुष, तरुण मुले-मुली यांचीही वर्दळ चालू असते. याशिवाय, अवघ्या २०० मीटर अंतरावर बुद्ध विहार, हनुमान मंदिर आणि प्राथमिक शाळा आहे. नागरिकांच्या माहितीनुसार, बियर बार मालक वस्तीबाहेरील आपला बियर बार बंद करून रहदारीच्या ठिकाणी साकरी फाट्यावर नवीन बार सुरू करत आहेत, त्यामुळे त्याची परवानगी नाकारण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे.
परिसरात आधीच अनेक बार असल्याने नागरिक त्रस्त
कंडारी वॉर्ड क्रमांक ५ ची लोकसंख्या सुमारे ३००० इतकी आहे. या परिसरात आधीच १) सोसायटी वाईन, २) गुरु बार, ३) सागर बार, ४) पालखी बार, ५) मधुवन बार, ६) तनारिका बिअर बार, ७) अपना बिअर बार, ८) सोमनाथ बियर शॉपी आणि ९) सुरुची बार असे अनेक मद्यविक्रीचे अड्डे असल्याने परिसरातील नागरिक आधीच खूप त्रस्त आहेत.
असामाजिक घटकांमुळे भीतीचे वातावरण
गेल्या काही दिवसांपासून साकरी फाटा या ठिकाणी सोमनाथ बियर शॉपी आणि पहलवान ढाबा सुरू करण्यात आलेला आहे. शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील गुंड प्रवृत्तीचे लोक तसेच मद्यपी नेहमी साकरी फाट्यावर गोंधळ करतात व त्यांच्यात भांडणे होतात. तसेच त्या पहलवान ढाब्यामध्ये मुतारीची व्यवस्था नसल्याने दारू पिणारे लोक महिलांकडे न पाहता रस्त्यावरच लघुशंका करतात. उशिरा रात्री कामावरून घरी येणारे स्त्री-पुरुष आणि क्लासेसवरून येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत, या नवीन बारला परवानगी मिळाल्यास सर्व गावकरी अजून जास्त त्रस्त होतील. त्यामुळे, कोणालाही मद्यविक्रीची परवानगी देऊ नये अशी नागरिकांची कडकडीची विनंती आहे.