कोल्हापूर-वृत्तसेवा | येथील प्रसिद्ध लेखक व कादंबरीकार प्रा. कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. देशातील चोवीस प्रादेशिक भाषांतील साहित्यासाठी पुरस्कार जाहीर झाले असून, मराठी भाषेसाठीचा बहुमान ‘रिंगाण’ला मिळाला आहे.
अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांनी नवी दिल्ली येथे पुरस्कारांची घोषणा केली. दरम्यान, रोख एक लाख रुपये आणि ताम्रपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून बारा मार्चला पुरस्कार वितरण होणार आहे.
तसेच प्रकाश पर्येकर यांच्या कोकणी भाषेतील ‘वर्सल’ या कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय विविध भाषांतील साहित्यिक, कवी, कादंबरीकारांनाही या सन्मानाने गौरविण्यात येईल. विविध २४ भारतीय भाषांतील ९ कविता संग्रह, ६ कथा, ५ कथासंग्रह, तीन निबंध आणि एका टीकात्मक पुस्तकालाही पुरस्कार जाहीर झाला आहे.
हिंदी भाषेत हा पुरस्कार लेखक संजीव यांना त्यांच्या ‘मुझे पाहानो’ या कादंबरीसाठी तर इंग्रजीसाठी नीलमशरण कौर आणि उर्दूसाठी सादिक नवाब सहार यांना हा सन्मान जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवासराव यांनी पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली.
अन्य पुरस्कार विजेत्यांमध्ये स्वर्णजीत सवी (पंजाबी), विजय वर्मा (डोगरी), विनोद जोशी (गुजराती), मन्शूर बनिहाली (काश्मिरी), सोरोख्खैबम गंभिनी (मणिपुरी), आशुतोष परिडा (उडिया), गजेसिंह राजपुरोहित (राजस्थानी), अरुणरंजन मिश्र (संस्कृत), विनोद आसुदानी (सिंधी), स्वपनमय चक्रवर्ती (बांगला), राजशेखरन (तमीळ), प्रणवज्योती डेका (आसामी), नंदेश्वर दैमारी (बोडो), तारासीन बासकी (संथाळी), टी. पतंजली शास्त्री (तेलुगू), लक्ष्मीशा तोल्पडी (कन्नड), बासुकीनाथ झा (मैथिली), युद्धवीर राणा (नेपाळी) आणि ई. व्ही. रामकृष्णन (मल्याळी) यांचा समावेश आहे. या पुरस्कारांचे पुढील वर्षी १२ मार्च रोजी वितरण करण्यात येईल.
मराठी कादंबरी लेखनात प्रा. खोत यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. ‘गावठाण’ (२००५), ‘रौंदाळा’ (२००८), ‘झड-झिंबड’ (२०१२), ‘धूळमाती’ (२०१४), ‘रिंगाण’ (२०१८) या त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या आहेत. त्यातून बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण त्यांनी केले आहे. ‘नांगरल्याविन भुई’ हे ललित व्यक्तिचित्रणही वाचकप्रिय आहे. कथा आणि कविता या साहित्यप्रकारातही त्यांनी विपुल लेखन केले आहे. गावगाडा, गावगाड्यातील बदलती स्थित्यंतरे आणि जगण्याचा संघर्ष हा त्यांच्या लिखानाचा मुख्य विषय राहिला आहे. त्यांच्या साहित्यकृतींना राज्य शासनासह अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
श्री. खोत मूळचे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडीचे. या गावात १९८७ मध्ये वीज आली. गावात शिक्षणाची सोय नव्हती. ग्रामीण वातावरणात वाढलेल्या प्रा. खोत यांनी आपल्या लेखनातून गावगाड्याचा सर्वांगाने वेध घेतला. सध्या ते, कळे ज्युनिअर कॉलेजमध्ये आहेत. पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी ते कॉलेजमधीलच एका कार्यक्रमात व्यस्त होते. ‘रिंगाण’ या कादंबरीला यापूर्वी महाराष्ट्र फाउंडेशनसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.