अमळनेर-गजानन पाटील (स्पेशल रिपोर्ट ) | नेहमी ‘एकच वादा अजितदादा !’ असा नारा बुलंद करणारे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी आज थेट अजितदादांनाच चकवा देत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अफवांना पुर्णविराम देतांनाच आगामी काळातील वाटचालीची दिशा देखील स्पष्ट केली असून यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अमळनेरविधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी आपली भूमिका स्पष्ट करतांना आगामी विधानसभा निवडणूक आपण अपक्ष लढविणार असल्याची घोषणा करत दंड थोपटले आहेत. तर माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील हे शरद पवार गटाच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. ते क्रांती दिन म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी आपली भूमिका स्पष्ट करतील असे संकेत देखील मिळाले होते.
तथापि, साहेबरावदादांनी पत्रकार परिषद घेण्याआधीच मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी थेट त्यांच्या घरी भेट देऊन दिलजमाई करण्याचा प्रयत्न केला. यामुळे दोन्ही दादांमध्ये ‘तडजोड’ झाल्याची चर्चा सुरू झाली. अनिलदादांनी विधानसभा तर साहेबरावदादांनी नगरपालिका सांभाळावी असा दोघांमध्ये समझोता झाल्याची आवई देखील सोशल मीडियातून उठली. एकंदरीत पाहता अनिल पाटील यांनी साहेबरावदादांना ‘पटविले’ असाच या चर्चांचा रोख होता. तसेच ते आज अजितदादा पवार यांच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित असतील असे देखील मानले गेले.
दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्या सहकाऱ्यांसह आज जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अमळनेरात आले. त्यांनी माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या ‘राजभवन’ या निवासस्थानी भेट दिली. तथापि, खुद्द साहेबरावदादा हे याप्रसंगी उपस्थित नव्हते. तर त्यांनी अनेक जणांनी कॉल केला असतांना देखील त्यांनी कुणाला उत्तर दिले नाही. यामुळे साहेबराव पाटील यांनी अजितदादांना चकवा देतांनाच आगामी काळात आपण त्यांच्या सोबत राहणार नसतील असे स्पष्ट संकेत दिले आहेत. याच माध्यमातून त्यांनी ना. अनिल भाईदास पाटील यांना सूचक इशारा दिल्याचेही मानले जात आहे.
दरम्यान, या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने माजी आमदार साहेबरावदादा पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. यामुळे साहेबरावदादांचे अगदी ऐन वेळेस ‘नॉट रिचेबल’ असणे हे अमळनेरच्या राजकारणातील आगामी काळातल्या वादळाची चाहूल तर नव्हे ना ? अशी जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे.