सचिन वाझे यांना वसुली करण्यासाठी नेमले- फडणवीस

नवी दिल्ली वृत्तसंस्था । शिवसेना आणि सचिन वाझे यांचे आधीपासूनच जवळचे संबंध असून विद्यमान राज्य सरकारने मुंबईत वसुली करण्यासाठी वाझे यांना नेमले होते असा धक्कादायक आरोप माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर घणाघात केला. ते म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार कार्यरत असतांना शिवसेनेने दबाव टाकून सचिन वाझे यांना पोलीस दलात पुन्हा घेण्यास भाग पाडले. मात्र त्यांच्या विरूध्द आधीच खटला आणि चौकशी सुरू असल्याने मी नकार दिला. मात्र शिवसेनेने त्यांना घ्यायला लावले. वाझे यांच्या विरूध्द २०१७ साली खंडणीचा आरोप करण्यात आला. यात त्यांनी अटकपूर्व जामीन देखील घेतला. यानंतर ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर सचिन वाझे यांना क्राईम ब्रँचमध्ये घेण्यात आले. पीआयएच्या जागी एपीआयला प्रमुख करण्यात आले.

यानंतर मुंबईतील झालेल्या हाय प्रोफाईल प्रकरणांमध्ये वाझे यांनीच तपास केला. यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांच्या खालोखाल वाझे यांचे वजन असल्याचे दिसून आले. अगदी महत्वाच्या ब्रिफींगमध्ये ते उपस्थित असत. एका प्रकारे वाझे यांना वसुली अधिकारी म्हणून बसविण्यात आले. मुंबईत वाझे वसुली करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केली.

एनआयएच्या तपासात मनसुख हिरेन यांची गाडी वाझे यांनी घेतली होती. मात्र ते पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. यानंतर हिरेन यांचा खून झाला असून यात सचिन वाझे यांचा हात असल्याचा थेट आरोप फडणवीस यांनी केला. वाझे यांच्या सारख्या कुख्यात अधिकार्‍याला महत्वाच्या पदावर बसविले ते पाहता यात काही तरी संशयास्पद बाबी असल्याचे ते म्हणाले. यामुळे या प्रकरणाचा सखोल तपासण्याची आवश्यकता आहे. सरकारने इतका रस घेऊन वाझे यांना नियुक्त का केले ? याची चौकशी देखील होणे आवश्यक असल्याचे फडणवीस याप्रसंगी म्हणाले

Protected Content