घरकुल घोटाळा : ऐतिहासिक निकाल ; लोकप्रतिनिधींना चपराक

0court 383

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव न.पा. तील घरकुल घोटाळा प्रकरणी आज धुळे येथील न्यायालयाने सर्व ४८ आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली असून, हा निकाल अनेक दृष्टींनी ऐतिहासिक ठरला आहे. तसेच जनतेचा पैसा वापरताना जराही न कचरणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्यामुळे चांगलीच चपराक बसली आहे. त्याचबरोबर आपल्या प्रमुख नेत्याच्या आदेशाचे आंधळेपणाने पालन करणाऱ्या स्थानिक नेत्यांना हा निकाल मोठा इशारा ठरला आहे.

 

या खटल्यात प्रथमच आरोपींना कोटीच्या कोटी रकमांचा दंड ठोठावण्यात आला आहे तर एकाच खटल्यात एवढ्या मोठ्या संख्येने नेत्यांना कारावास आणि दंडाची शिक्षा देण्यात आली आहे. प्रमुख तीन आरोपी मिळून दंडाची रक्कम चक्क १८० कोटी एवढी आहे, त्यातही एकट्या सुरेश जैन यांना १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एका आरोपीला एखाद्या खटल्यात दंड म्हणून आकारली गेलेली ही रक्कम देशातील आजवरची सर्वाधिक रक्कम आहे.
जनतेच्या पैशांचा अपहार करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींना या निकालामुळे चांगलाच धडा मिळाला आहे. हे लोकप्रतिनिधी अगदी बेफिकीरपणे जनतेच्या पैशांची उधळपट्टी करताना दिसत असतात. त्यांच्या या वृत्तीला या निकालामुळे अटकाव होणार आहे. तसेच बऱ्याचदा स्थानिक नेते हे आपल्या राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील नेत्याच्या आदेशाने स्थानिक पातळीवर निर्णय घेत असतात. त्यामागे त्यांची भूमिका आपल्या नेत्याबद्दल आदर आणि निष्ठा दाखवणे ही असते. बऱ्याचदा गैरप्रकार होत असल्याचे त्यांना जाणवत असूनही आपला नेता सगळे सांभाळून घेईल, अशी एक विनाकारण त्यांना खात्री वाटत असते. आजच्या निकालामुळे असे सगळे छोटे नेते सावध होणार असून आपल्या नेत्याचा आदेश पाळताना ते आधी १०० वेळा विचार करतील हे नक्की!

घोटाळा अन खटल्याची पार्श्वभूमी :-
१९९९ साली तत्कालीन नगर पालिकेने शहरातील वेगवेगळ्या झोपडपट्टी धारकांना मोफत घरे देण्यासाठी ११० कोटी रुपये खर्चाची व ११ हजार घरकुलांची निर्मिती करणारी महत्वाकांक्षी योजना हाती घेतली. ही योजना सुरवातीपासूनच वादग्रस्त ठरत गेली. अखेरीस २००६ साली तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या योजनेत ४८ कोटींचा अपहर झाल्याची तक्रार दाखल केली. तेव्हापासून ही योजना जळगाव मनपाच्या विकासात मोठा अडथळा ठरली होती. त्यामुळे मनपा कर्जबाजारी होवून विकासकामे ठप्प झाली होती.

हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्याच्या पाठोपाठ इतरही काही घोटाळे उघड झाले. या सगळ्या घोटाळ्यांची एकत्रित रक्कम वाढत-वाढत ६५० कोटींपर्यन्त पोहोचली. त्यात एकट्या घरकुल योजनेत ३६५ कोटी तर आय.बी.पी., स्टार्च फॅक्टरी कर्ज, वाघुर पाणीपुरवठा योजना, विमानतळ उभारणी व भूकंप सहाय्यता निधी असे घोटाळे मिळून ती रक्कम ६५० कोटींपर्यन्त पोहोचली होती. तेव्हापासूनच संपूर्ण राज्यात हा घोटाळा गाजत होता. यात माजी मंत्री सुरेश जैन व गुलाबराव देवकर अडकल्याने या खटल्याच्या निकालाकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. सुरुवातीला यातील दिग्गज नेत्यांच्या राजकीय दबावामुळे या गुन्ह्याचा तपास व खटल्याचे कामकाज अतिशय संथ गतीने सुरु होते. पण तत्कालीन विधानसभेचे विरोधीपक्ष नेते एकनाथराव खडसे यांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर तपासाला वेग येवून सुरेश जैन व देवकर यांच्यासह सगळ्या दिग्गज नेत्यांना अटक होवून जेलमध्ये जावे लागले होते. या खटल्याची सुनावणी नि:स्पृह वातावरणात व्हावी, यासाठी धुळे न्यायालयाची निवड करण्यात आली होती. त्यानुसार आज सुनावणी पूर्ण होवून हा ऐतिहासिक निकाल जाहीर झाला आहे.

Protected Content