वारसदार निर्माण करण्यात पवार अयशस्वी : ठाकरे गटाचे खडे बोल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करतांना ठाकरे गटाने थेट राष्ट्रवादी व त्यातही शरद पवार यांच्यावर आज शरसंधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनामधून आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत कलहावर टोकदार भाष्य करण्यात आले आहे. यातून पवारांना खडे बोल देखील सुनावण्यात आलेले आहे.

या अग्रलेखात म्हटले आहे की, पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले व त्यामुळे चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मनधरणी केली व लोकभावनेचा आदर राखून पवार यांनी राजीनामा मागे घेतला व यापुढे तेच राष्ट्रवादी कॉंग्रेसची धुरा सांभाळतील. त्यामुळे गेले चार-पाच दिवस सुरू असलेल्या नाटयावर पडदा पडला असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

शिवसेना-उबाठा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यांच्यात गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्यांवरून संघर्ष उफाळून आल्याचे दिसून येत आहे. यातच आता शिवसेनेने थेट शरद पवार यांच्यावरच प्रश्‍नचिन्हा उपस्थित करत खडे बोल सुनावल्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये सारेच काही आलबेल नसल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content