मुंबई प्रतिनिधी । मुंबई येथील वाडिया रुग्णालयासाठी दिलासा देणारा निर्णय मुंबई महापालिकेकडून घेण्यात आला आहे. राज्य सरकार आणि पालिकेकडून मिळणारे अनुदान थकीत असल्याचे कारण देत वाडिया रुग्णालय प्रशासनाने दोन्ही रुग्णालये बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यावर पालिकेने तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत वाडियाला 22 कोटी रूपयांचे अनुदान तात्काळ देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
कोणत्याही परिस्थितीत हे रुग्णालय बंद होऊ देणार नाही, असा पवित्रा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी घेतला आहे. तर जमीन लाटण्यासाठी रुग्णालय बंद करण्याचा घाट ठाकरे सरकारने घातल्याच आरोप भाजपने केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या तातडीच्या बैठकीत, तत्परतेने वाडिया रुग्णालयासाठी 22 कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई महापालिकेकडून 135 कोटीचे अनुदान थकीत असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र महापालिकेच्या दाव्यानुसार केवळ 20 कोटीचेच देणे बाकी आहे. पालिका प्रशासनाने रुग्णालयाचा दावा फेटाळत, फक्त 21 ते 22 कोटीचं देणे बाकी असल्याचे स्पष्ट केले. वाडिया प्रशासन वाढीव बेड आणि वाढीव कर्मचाऱ्यांनुसार अनुदान मागत आहेत. मात्र हे देणे शक्य नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.