पृथ्वीराज चव्हाण यांचा पुन्हा पक्ष नेतृत्वावरून निशाणा

 

मुंबई प्रतिनिधी । राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित करून निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ‘मुंबई तक’शी साधलेल्या विशेष सवादा दरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. “२०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर अचानक राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अध्यक्षपद सोडण्याचं पक्षाला नुकसान असं झालं की पक्ष निवडणुकीत मिळालेल्या पराभवाची समिक्षाच करू शकला नाही. त्यावेळी आमच्याकडे नेतृत्वच नव्हतं. त्यानंतर सोनिया गांधी या अंतरिम अध्यक्षा बनल्या. परंतु त्यांची प्रकृती पाहता त्या कायम कार्यरत असतील आणि आपल्या कार्यकर्त्यांसाठी कायम उपस्थित राहतील अशी अपेक्षा करता येणार नाही,” असं चव्हाण यांनी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

“देशाची अर्थव्यवस्था बिकट स्थितीत आहे. चीनसोबतही दररोज चकमकीचं वृत्त येत आहे. याव्यतिरिक्तही अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. असं असतानाही पक्षाकडे पूर्णवेळ नेतृत्व नसल्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका योग्यरित्या पार पाडू शकत नाही,” असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित केला.

“राहुल गांधी जर पक्षाचं नेतृत्व करण्यास तयार असल्यास यापेक्षा उत्तम काहीच असू शकत नाह. परंतु त्यांना पक्षाचं नेतृत्व करायचं नाही. सोनिया गांधी आपल्या प्रकृतीच्या तक्रारींमुळे आपला पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत. म्हणून आम्ही वर्कींग पार्लियामेंट बोर्डाची मागणी केली होती. हे गेल्या अनेक वर्षांपासून नाही आणि त्या मागणीत काही गैरही नाही,” असंही त्यांनी सांगितलं.

Protected Content