जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशभरातील शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांमध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा अव्वल ठरल्याची धक्कादायक बाब एनसीआरबीच्या ताज्या अहवालातून समोर आली आहे. राज्यात दररोज सरासरी १७ शेतकरी आत्महत्या करत असल्याची नोंद या अहवालात करण्यात आली असून त्यामुळे कृषी संकटाची भीषणता पुन्हा अधोरेखित झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधत कवितेच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.
रोहिणी खडसे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक भावनिक कविता पोस्ट केली. या कवितेतून त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करत शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांबद्दल सरकारला जबाबदार धरले आहे.

अभिनंदन साहेब, तुम्ही हे करून दाखवलं,
माझ्या माता भगिनींच्या कपाळाचे कुंकू पुसून दाखवलं…
शेतकऱ्यांच्या घामाला आधी मातीमोल केलं,
अन् त्यांच्या आत्महत्येच्या शर्यतीत तुम्ही नंबर ‘एक’च बक्षिस पटकावलं !
कोण म्हणतो विकास झाला नाही?
आता माझ्या शेतकऱ्याच्या बांधावरून हायवे गेलाय, रोड गेलाय..
पण माझ्या शेतकऱ्याची आता जमीनच नाही!
आनंद साजरा करा, तुम्हाला झुकवणारा शेतकरी तुम्ही संपवला…
एक जाहिरात अशीही येऊ द्या..
‘महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यांमध्ये पहिला’
कवितेच्या शेवटी त्यांनी सरकारवर उपरोधिक शब्दांत टीका करत “आनंद साजरा करा, तुम्हाला झुकवणारा शेतकरी तुम्ही संपवला… एक जाहिरात अशीही येऊ द्या.. ‘महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यांमध्ये पहिला’!” असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधकांकडूनही राज्य सरकारच्या कृषी धोरणांवर प्रश्न उपस्थित केले जात असून शेतकरी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.



