Home क्राईम वाघळीत स्मार्ट मीटरविरोधात भर पावसात रास्तारोको 

वाघळीत स्मार्ट मीटरविरोधात भर पावसात रास्तारोको 

0
11


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे स्मार्ट वीज मीटरच्या विरोधात ग्रामस्थांनी बुधवारी भर पावसात तीव्र रास्तारोको आंदोलन छेडले. गावात बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर तात्काळ हटवून पूर्वीप्रमाणे पोस्टपेड वीज मीटर बसविण्यात यावेत, या प्रमुख मागणीसाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

वाघळी गावातील सोसायटीसमोरील महामार्गावर ग्रामस्थांनी रास्तारोको करत स्मार्ट मीटरविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुसळधार पाऊस सुरू असतानाही नागरिकांनी आंदोलन सुरू ठेवत आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका घेतली. या आंदोलनात महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीजबिलांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून सर्वसामान्य ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. महागाईच्या काळात वाढीव वीजबिले भरणे अनेक कुटुंबांसाठी कठीण होत असल्याने स्मार्ट मीटर प्रणालीबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पूर्वीप्रमाणे पोस्टपेड वीज मीटरच कायम ठेवावेत, अशी मागणी त्यांनी केली.

रास्तारोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आंदोलनस्थळी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ग्रामस्थांनी प्रशासनाने त्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन स्मार्ट मीटर हटविण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. अन्यथा आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. वीजग्राहकांच्या हिताचा विचार करून शासनाने या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound