Home आरोग्य भोकर ग्रामपंचायतीतील दूषित पाणीपुरवठ्यावर संताप ; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

भोकर ग्रामपंचायतीतील दूषित पाणीपुरवठ्यावर संताप ; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

0
14


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भोकर ग्रामपंचायत हद्दीत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सुरू असलेल्या दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेऊन पुढील 24 ते 48 तासांत कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडून जबाबदार अधिकाऱ्यांनाच तेच दूषित पाणी पाजण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांना सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, भोकर ग्रामपंचायत हद्दीत वारंवार तक्रारी करूनही दूषित पाणीपुरवठ्याची समस्या कायम असून प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. संपूर्ण गावात दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ही समस्या तातडीने सोडविणे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे. ग्रामपंचायतीच्या प्लॉट एरिया (जुना व नवीन), कोळी वाडा, गुजर वाडा, बडगुजर वाडा, चांभार वाडा, दर्जाचा वाडा, कुणबी वाडा, डेबुर वाडा, मांग वाडा तसेच हरिहर महाराज मंदिर परिसरासह अनेक भागांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. पाण्याला दुर्गंधी येत असून ते पिण्यास अयोग्य असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दूषित पाण्यामुळे गावात उलट्या, जुलाब, गॅस्ट्रो, टायफॉइड आणि काविळ यांसारख्या आजारांचा धोका वाढल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. या समस्येमागील संभाव्य कारणांमध्ये पाण्याच्या टाकीची नियमित स्वच्छता न होणे, मुख्य जलवाहिनी फुटून त्यामध्ये गटाराचे पाणी मिसळणे तसेच पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक असलेली टीसीएल किंवा ब्लिचिंग पावडरचा योग्य वापर न होणे, यांचा उल्लेख करण्यात आला आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी करून दोष दूर करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

शुद्ध पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत ग्रामस्थांना टँकरद्वारे किंवा अन्य माध्यमातून स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच प्रशासनाने पुढील 24 ते 48 तासांत ठोस उपाययोजना न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि कायदेशीर मार्गाचाही अवलंब केला जाईल, असा इशारा प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले. यावेळी प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्यासह प्रभाकर कोळी, लोटन सोनवणे, एकनाथ सैंदाने, कविता सोनू बाविस्कर, चंद्रभागा कोळी, समाधान सपकाळे, धनराज वारडे, सुकदेव बाविस्कर तसेच गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Protected Content

Play sound