आनंदी गोपाळ : एक प्रभावी यशोगाथा ( चित्रपट समीक्षा)

सुमारे सव्वाशे वर्षापूर्वी इंग्रजी शिक्षणाचा प्रसार / प्रचार सुरु झाला होता, त्या काळात काहीतरी वेगळे करणाच्या वृत्तीची माणसे होती. याच काळात गोपाळ विनायक जोशी हे शिक्षणाच्या ध्येयाने पछाडलेले होते. त्यांनी आनंदी नावाच्या पत्नीला इंग्रजी भाषा शिकण्यासाठी प्रवृत्त केले. इतकेच नाही तर त्यांनी तिच्याकडून वैद्यकीय अभ्यास पूर्ण करण्यासाठी ते तिला अमेरिकेला पाठवले आणि आनंदीबाई गोपाळराव जोशी यांनी सुद्धा आपल्या हिमतीवर, जिद्दीने तो अभ्यास पूर्ण केला. गोपाळराव यांच्या सोबतीने आनंदीबाई फक्त शिकल्याच नाहीत तर भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यांच्या दोघांच्या नाते संबंधावर असलेला सहयोगाचा प्रवास आनंदी गोपाळ मध्ये सादर केला आहे.

नमः पिक्चर्स, फ्रेश लाईम फिल्म्स प्रोडक्शनने ह्या सिनेमाची निर्मिती केली आहे. निर्माते झी स्टुडीओज चे मंगेश कुलकर्णी, किशोर अरोरा, शारीन मंत्री केडिया, अरुनवा जॉय सेनगुप्ता, आकाश चावला, हे आहेत. दिग्दर्शन समीर विध्वांस यांनी केल असून पटकथा करण श्रीकांत शर्मा, संवाद इरावती कर्णिक, छायाचित्रण आकाश अग्रवाल यांचे आहे. वैभव जोशी यांच्या गीतांना संगीत ऋषिकेश दातार, सौरभ भालेराव, जसराज जोशी यांनी दिले आहे. यामध्ये प्रमुख भूमिकेत ललित प्रभाकर, भाग्यश्री मिलिंद हे आहेत. सोबत अंकिता गोस्वामी, गीतांजली कुलकर्णी, क्षिती जोग, योगेश सोमण, जयंत सावरकर, अथर्व फडणीस, असे कलाकार आहेत.

आनंदी गोपाळ हा एक चरित्रपट आहे, दोघांच्या जीवनाचा प्रवास या मध्ये प्रभावीपणे मांडला आहे. हा प्रवास दाखवताना त्यांचे नाते संबंध कसे होते, समाजाचा विरोध असून सुद्धा नेटाने आणि हिमतीने त्यांनी आपले योजलेले कार्य पूर्ण केले. गोपाळराव यांचा स्वभाव हा हेकेखोर, विक्षिप्त, हट्टी, रागीट असा असल्याने आनंदीबाई यांना खूप सोसावे लागले. त्या काळात मुलीनी शिकावे हे समाजाने मान्य केले नव्हते, गोपाळराव हे टपाल खात्यात नोकरी करायचे इंग्रजी भाषेशी त्यांचा संबंध आला, इंग्रजीचे ज्ञान आपल्याकडील लोकांनी शिकायला हवे अशी त्यांची तळमळ होती. आपल्या बायकोनी शिकावे असे त्यांना वाटत होते, पहिल्या बायकोला त्यांनी शिकविण्याचा प्रयत्न केला पण तिचे आयुष्य कमी होते, गोपाळराव यांनी दुसरे लग्न करताना बायकोने शिकायला पाहिजे हि अट घातली होती आनंदीबाई ला तिच्या वडिलांनी शिकवलं होते आणि आता नवरा सुद्धा शिकवणार होता, त्यांच्या प्रयत्नाने आनंदीबाई ला शिक्षणांची गोडी लागली आणि त्या डॉक्टर झाल्या.

दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी त्या काळाचे चित्रण खूप छान केले आहे. तो काळ दाखविण्यासाठी केलेली मेहनत जाणवते. आनंदीबाई च्या आजूबाजूची माणसे, तिच्या मैत्रिणी हे सारे त्यांनी प्रभावीपणे दाखवले आहे. त्याकाळी कोणते खेळ खेळले जात असतील त्यांचे यथार्थ चित्रण त्यांनी केले आहे. अभ्यास हा सुद्धा खेळ असायचा, त्यातूनच तिला गोडी निर्माण झाली त्यातूनच आनंदीबाई ची प्रगती दाखवली आहे. अभ्यासा बरोबर तिच्या मनांत आणि गोपाळराव यांच्या मनांत काय घडत होते इत्यादी भावनिक प्रसंग आणि त्यांचा मानसिक जडण-घड्नेचा प्रवास प्रामुख्याने दाखवला आहे. आनंदीबाई – गोपाळराव यांच्या आयुच्यात जे जे टप्पे येत गेले त्याचा बारकाईने विचार करून ते सादर केल आहे.

आनंदीबाई ची भूमिका भाग्यश्री मिलिंद हिने प्रभावीपणे सादर केली आहे, त्यांची अभ्यासाविषयी असलेली ओढ आणि खेळण्याचे वय या मधील फरक छान व्यक्त केला आहे. गोपाळरावची भूमिका ललित प्रभाकर यांनी समर्थपणे सादर केली आहे. गोपाळराव चा विक्षिप्तपणा, तिरसटपणा, रागीट वृत्ती हे दाखवताना त्यांचे शिक्षणा विषयी असलेलं प्रेम त्यांनी उत्तमपणे साकारले आहे. समाज विरोधात असतानाचे प्रसंग आणि त्यावेळची मानसिक स्थिती त्यांनी छान व्यक्त केली आहे. चित्रपटाची गतिमानता करण श्रीकांत शर्मा यांनी लिहिलेल्या पटकथे ने साध्य केली असून सहज सुलभ संवाद लेखन इरावती कर्णिक यांनी केल आहे, चित्रपटाचे संगीत हे ऋषिकेश दातार, सौरभ भालेराव, जसराज जोशी यांनी दिलेलं असून ती एक जमेची बाजू आहे. एकंदरीत चित्रपट हा मनोवेधक झाला आहे.

दीनानाथ घारपुरे ( मुंबई )

संपर्क- ९९३०११२९९७

Add Comment

Protected Content