बुलडाणा जिल्हाअंतर्गत विद्युत क्षेत्रातील विषयांचा आढावा बैठक

बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  ग्रामीण, शहर, उदयॊग व शेती यांना कायमस्वरूपी व अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व सुधारीत वितरण क्षेत्र योजना (RDSS) या सारख्या महत्वाकांक्षी योजना आणल्या आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत शेतीसाठी दिवसा वीज मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल होणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कपंनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी दिले.

बुलडाणा जिल्हाअंतर्गत विद्युत क्षेत्रातील विषयांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन सभागृहात शुक्रवारी ३ नोव्हेंबर रोजी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार संजय रायमुलकर, महावितरणचे संचालक अरविंद भादीकर, प्रादेशिक संचालक  सुहास रंगारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना श्री. विश्वास पाठक म्हणाले की, ऊर्जामंत्री यांच्या दुरदृष्टीने राज्यात सुधारीत वितरण क्षेत्र योजना (RDSS) मध्ये ४२ हजार कोटींची यंत्रणा बळकटीकरणाची कामे होत आहेत, त्यापैकी जिल्ह्यात सुमारे १ हजार ५०० कोटी रूपयांचे काम सुरू झाले आहे. यामुळे वितरण हानी कमी होऊन जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीज सेवा मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या महावितरण,महापारेषणच्या विविध योजनांचे योग्य नियोजन व अंमलबजावणी करावी.

जिल्ह्यातील वीज सेवा ग्राहकांना अनुरूप ठेवण्यावर भर देण्यात यावा, त्यासाठी जिल्यातील वीज ग्राहक आणि लोकप्रतिनिधींच्या ऊर्जा क्षेत्राबद्दल असलेल्या सूचना, समस्या व तक्रारांची गांभीर्याने दखल घेऊन त्या प्राधान्याने सोडविण्यात याव्यात. विद्युत अपघातामुळे अनेक वेळा प्राण गमवावे लागतात ही दुर्दैवाची बाब असून विद्युत अपघात शून्य होण्यासाठी विद्युत निरीक्षक विभागांनी शाळा तथा ग्राहकांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम राबवावेत, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

संचालक ( मानव संसाधन ) अरविंद भादीकर यांनी नादुरूस्त झालेल्या रोहित्राची तत्काळ माहिती मिळावी यासाठी रिपोर्टींग मेकॅनिझम तयार करण्यास सांगीतले. याशिवाय कृती मानकांनुसार नादुरूस्त रोहित्र बदलून देण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. वितरण हानी कमी करण्यासाठी विभागानुसार नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सुचना  यावेळी त्यांनी केल्या. येणाऱ्या काळात स्मार्ट मिटरमुळे ग्राहकांना होणारे फायदे आणि सुविंधाबाबत माहिती देण्यात यावी, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्ह्यातील महावितरणचा महसूल, वसुली, थकबाकी, वीज गळती, त्यावरील उपाययोजना, पायाभूत सुविधा, वीज पुरवठा यंत्रणेची सद्यस्थिती आणि प्रस्तावित नियोजन यासंदर्भात मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी, तर महापारेषणच्या संदर्भात मुख्य अभियंता जयंत विके, महाऊर्जा विभागाशी संबंधीत प्रफुल्ल तायडे यांनी सविस्तर सादरीकरण बैठकीमध्ये केले. या बैठकीला महावितरण, महापारेषण, महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभाग या विद्युत क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी व अभियंते उपस्थित होते.

Protected Content