मु.जे.महाविद्यालयात गणित विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयात  ६ नोव्हेंबर रोजी “गणित विषयातील आधुनिक कल” या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात येत आहे. सदर राष्ट्रीय परिषद प्रा. डॉ. जे. एन. चौधरी यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात येत आहे.

प्रा. चौधरी हे मुळजी जेठा महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून मागील 34 वर्षापासून कार्यरत असून, त्यांनी गणित विषयात आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय संशोधन केले आहे. प्रा. चौधरी सध्या  मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे परीक्षा समन्वयक आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गणित अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. प्रा. चौधरी यांच्या संशोधन आणि शैक्षणिक कर्तुत्वाची दखल घेत विद्यापीठाने 2017 मध्ये त्यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे.

सदर राष्ट्रीय परिषदेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे गणितज्ञ प्रा. पी. विरमणी, प्रा. विनायक जोशी आणि प्रा. सुखेंडू कार यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे. परिषदेच्या फलद्रुप आणि यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी प्रकुलगुरू, प्रा. एस.टी. इंगळे, माजी कुलगुरू प्रा. के. बी. पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच परिषदेच्या यशस्वीतेसाठी मुळजी जेठा महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य स.ना. भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रीय परिषदेचे संयोजक प्रा. डॉ. कुणाल इंगळे ,प्रा. सुहास तायडे  प्रा.समिर पाटील  प्रा. हेमंत बेडाळे व प्रा.दिपक पथवे आणि शिक्षकेतर कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत असून, आमंत्रित व सहभागी होणाऱ्या गणितज्ञांचे स्वागतास उत्सुक आहेत.

Protected Content