जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील एका आश्रम शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी आपल्या थकीत वेतन, अर्जित रजा रोखीकरण आणि थकीत निधीवरील व्याजाचे बिल त्वरित मिळावे, या मागणीसाठी जळगाव शहरात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचा मुहूर्त साधत सामाजिक न्याय भवनासमोर कुटुंबासह हे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत त्यांच्या थकीत रकमेचा आणि पेन्शनचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, असा निर्धार उपोषणकर्ते गोविंदा गुंजाळ यांनी व्यक्त केला आहे.
गोविंदा गुंजाळ यांनी १९९२ पासून जामनेर तालुक्यातील शेंगोळे येथील माध्यमिक आश्रम शाळेत उपशिक्षक म्हणून नोकरी केली आणि ते २०२४ मध्ये मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. मात्र, १ नोव्हेंबर २०१८ ते ३१ मे २०२४ या दरम्यान त्यांचे वेतन थकीत ठेवण्यात आले होते. याव्यतिरिक्त, त्यांच्या शिल्लक असलेल्या ८१ दिवसांच्या अर्जित रजेचे रोखीकरणही त्यांना अद्याप मिळालेले नाही.
आपले थकीत वेतन, पेन्शन योजना आणि अर्जित रजा रोखीकरण मिळवण्यासाठी गुंजाळ यांनी यापूर्वी जळगाव, नाशिक आणि पुणे येथील संबंधित कार्यालयांशी अनेक वेळा पत्रव्यवहार केला. मात्र, त्यांना या संदर्भात कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. त्यामुळे अखेरीस त्यांनी आज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून जळगावातील महाबळ परिसरातील सामाजिक न्याय भवनच्या कार्यालयासमोर आपल्या कुटुंबासह आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
उपोषण करते गोविंदा गुंजाळ यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही, म्हणजेच त्यांची थकीत वेतनाची रक्कम, पेन्शन आणि अर्जित रजा रोखीकरण मिळत नाही, तोपर्यंत त्यांचे हे आमरण उपोषण सुरूच राहील. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. सामाजिक न्याय दिनी एका सेवानिवृत्त शिक्षकाला आपल्या हक्कांसाठी कुटुंबासह उपोषणाला बसावे लागणे, हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करते. या आंदोलनाची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.