सेवानिवृत्त फौजदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न

जळगाव प्रतिनिधी । फैजपूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिस संशयितांना अटक करीत नसल्याचा आरोप करीत सेवानिवृत्त फौजदार शेख शकील शेख दगू यांनी आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला.

याबाबत वृत्त असे की, १८ जुलै रोजी दुपारी १ ते १.३० वाजेच्या दरम्यान शेख शकील यांना फैजपूरमध्ये माजी नगरसेवक शेख जफर शेख अजगर व त्यांच्या नातेवाइकांनी शिवीगाळ करीत मारहाण करत पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच विषारी औषधाची बाटली तोंडावर फवारून खिशातील २० हजार रुपये काढून घेतल्याचा आरोप शेख यांनी केला होता. या प्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिस ठाण्यात कलम ३०७, ३९५, ३४१, १४३, ३२० व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यातील आरोपींना २४ तासांत अटक न केल्यास २२ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा १९ जुलै रोजी पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला होता.

दरम्यान, संंबंधीत आरोपींना अटक न झाल्यामुळे शेख हे सोमवारी दुपारी पेट्रोलची बाटली घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनासाठी आले. परंतु आत्मदहनापूर्वीच जिल्हापेठ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

Protected Content