मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध शिथील करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी नियम पाळून सण साजरे करण्यास परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील निर्बंध हळहळू शिथील केले जातील असे सांगितल्यामुळे ‘आता सण सणासारखा; सर्वांच्या मनासारखा होईल.’ अशी भावना सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
राज्यात आता कोरोनाचे सावट कमी झाले आहे. रूग्णसंख्याही कमी होताना दिसत असल्याने राज्यातील नागरिकांना दिलासा मिळत आहे. अशातच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी सांगितले
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिलला होणाऱ्या १३१ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, काल सहयाद्री अतिथीगृह येथे महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित होते.
त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, “गेली दोन वर्षे डॉ.बाबासाहेबांची जयंती उत्सव व पुण्यतिथीनिमित्त अभिवादन अशा दोन्हीही कार्यक्रमात आपण कोरोना निर्बंधांमुळे अतिशय संयम पाळला आणि नियमांचे काटेकोर पालन केले. ही खरोखरच खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. आता हे कोरोनाचे सावट कमी झाले आहे आणि या महामानवाची जयंती आपणा सर्वांना उत्साहाने साजरी करायची आहे.”
गुडीपाडव्याबाबतचा निर्णयाबाबत बोलतांना आरोग्यमंत्री टोपे यांनी, “याबाबत मिरवणुकांना परवानगी देण्याबाबतचा निर्णय निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करून घेतला जाईल. शोभायात्रांबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असा मला विश्वास असून याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे असे आरोग्यमंत्री टोपे यावेळी म्हणाले. राज्यातील निर्बंध हळहळू शिथील केले जातील असे सांगत सणवार साजरे करताना काळजी घ्या, शिस्त पाळून सण साजरे करा. असे राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.