लोकल सुरु करण्याची मध्य रेल्वेची तयारी

मुंबई वृत्तसंस्था । मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी लोकल सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शविली आहे. राज्य सरकारने हिरवा कंदील दिल्यास आम्ही लोकल सुरू करू, असे गोयल म्हणाले. लोकलसेवा सुरू करायची की नाही, याचा निर्णय पूर्णपणे राज्य सरकारवर अवलंबून आहे.

राज्य सरकारने लोकल सुरू करण्याची मागणी रेल्वे मंत्रालयाकडे करायला हवी. ती मागणी रेल्वे मंत्रालयाने मान्य केली व तसे आम्हाला कळवल्यास सरकारने सांगताच आम्ही लोकलसेवा सुरू करू, असे गोयल यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील लोकलसेवा गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या विशेष फेऱ्या सुरू आहेत. अन्य प्रवाशांना आजही लोकलचे दरवाजे बंदच आहेत. त्यामुळे वसई, विरार, डहाणू, डोंबिवली, कल्याण, कर्जत, कसारा या पट्ट्यातून मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

करोना संसर्गाचा प्रादुर्भाव असला तरी कंपन्या व कार्यालये सुरू झाल्याने नियमावली निश्चित करून लोकलसेवा पूर्ववत करावी व प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. याच मागणीसाठी नालासोपारा येथे प्रवाशांनी रूळांवर उतरत तीव्र आंदोलन केले होते.

Protected Content