आगग्रस्त निराधार महिलेस भावसार यांची मदत

अमळनेर प्रतिनिधी । धाबे येथील आगग्रस्त निराधार महिलेस सेवानिवृत्त आदर्श शिक्षक स. ध. भावसार यांनी मदतीचा हात दिला.

याबाबत वृत्त असे की, पारोळा तालुक्यातील धाबे येथील गरीब आदिवासी निराधार महिला श्रीमती अनुताई भिल यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागुन रोख १२,२०० रुपयांसह सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले होते. हे वृत्त वाचुन प्रत्येक गरजवंताला शक्य ती मदतीसाठी धावुन जाणारे व मदतही देणारे शिवाजी हायस्कुलचे निवृत्त राज्य आदर्श शिक्षक सदानंद धडु भावसार (रा. पारोळा ) यांनी आज सकाळीच धाबे येथे श्रीमती अनुताई यांच्या जळालेल्या घराला भेट देवून त्यांचे सांत्वन करुन त्यांना रोख २१०० रुपये मदत दिली. यावेळी धाबे शाळेचे राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे, वरीष्ठ शिक्षक तथा पारोळा तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष गुणवंतराव पाटील, वीर एकलव्य बजरंग ग्रुपचे अध्यक्ष रविंद्र भिल, गुलाब भिल, सुनिल भिल आदी उपस्थित होते.

स.ध. भावसार सर मध्यमवर्गीय पेन्शनर व वयोवृद्ध असुनही ते अशा प्रसंगी मदतीसाठी धावुन जातात व शक्य ती मदतही करतात. आजपर्यंत त्यांनी व्यक्ती, संस्था, आपत्ती, दवाखाने, मुख्यमंत्री व पंतप्रधान मदत निधी अशा विविध गोष्टींना समाजाला मदत व्हावी व गरजवंताला काही ना काही दिलासा मिळावा म्हणुन काटकसरीने व आपल्या वैयक्तीक गरजा मर्यादित ठेवुन सात लाख, तेरा हजार, चारशे, चौसष्ट रुपयांची रोख मदत दिली आहे. गेल्या ४३ वर्षापासुन त्यांनी अभिनंदन, शुभेच्छा, विविध यश निवड, श्रध्दांजली व सांत्वन म्हणुन आजपर्यंत ४१५५० पत्रे स्वहस्ते लेखन करुन पाठविली आहेत. आजही हा लेखन व वाचनाचा छंद त्यांनी वेळेचे नियोजन व जीवन जगतांना सर्व गोष्टींचे काटेकोरपणे पालन करुन सुरु ठेवला आहे. त्यांना आजपर्यंत ११,२३६ लोकांनी पत्रे पाठविली असुन राज्यभरातुन ३९० जणांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या आहेत. गेल्या २६ वर्षापासुन ते दहावी, बारावी व पदवीत्तर परीक्षेत प्रथम येणार्‍यांना रोख बक्षिसे वाटप, गेल्या १४ वर्षापासुन तालुका वक्तृत्व स्पर्धा, विविध गुण गौरव व सत्कार समारंभ, बक्षिसे वाटप, पुस्तके वाटप व भेट असे उपक्रम एकटे कुणाचीही मदत न घेता राबवित आहेत. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य हेवा करण्या सारखे व आदर्श घेण्यासारखे आहे. अनेक पुरस्कारांचेही ते मानकरी ठरले आहेत.

Add Comment

Protected Content