जामनेर तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर; राजकीय घडामोडींना वेग

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज, २१ एप्रिल रोजी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत विनय गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नानासाहेब आकडे यांनी ही सोडत काढली.

पंचायत समिती हॉलमध्ये सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत ही आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. चिठ्ठ्यांद्वारे काढण्यात आलेल्या या सोडतीत डिंपल पवार या लहान मुलीच्या हस्ते आरक्षणाची घोषणा करण्यात आली.

जामनेर तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी १० जागा, अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी १५ जागा, नामाप्र (OBC) प्रवर्गासाठी २८ जागा आणि सर्वसाधारण (General) प्रवर्गासाठी ५४ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, एकूण १०७ ग्रामपंचायतींपैकी ५० टक्के ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. हे आरक्षण २०२५ ते २०३० या कालावधीसाठी लागू असेल.

या आरक्षण सोडतीला जामनेर तालुक्यातील अनेक सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आरक्षणामुळे तालुक्यातील अनेक राजकीय समीकरणे बदलली असून, आगामी निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

Protected Content