अमळनेर,लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – अमळनेर येथील दगडी दरवाज्या समोरील गटारीची दुरुस्ती नगरपरिषदेने तात्काळ करावी, अन्यथा लोक सहभागातून करावी हे स्पष्ट करा, अशी जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी यांनी इशारावजा मागणी नगरपरिषदेकडे केली आहे.
अमळनेर येथील संत सखाराम महाराज यात्रा उत्सवाला २५० वर्षांची परंपरा आहे. त्यानुसार आगामी काळात रथोत्सव, पालखी उत्सव पार पडणार आहे. रथोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय एकत्रित होतो, या पार्श्वभूमीवर शहरातील दगडी दरवाजा समोरील राजे संभाजी चौकातील मुख्य गटार दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी यांनी केली आहे.
गेल्या काळात संत सखाराम महाराज यात्रोत्सव दरम्यान मुख्य गटारीवर दुचाकी चालकांचा अपघात देखील झाले होते. यावेळी देखील यात्रोत्सव दरम्यान अपघात होऊन गालबोट लागू शकते. त्यामुळे गटारीची दुरुस्ती अमळनेर नगरपरिषदेने तात्काळ करावी, नगरपरिषदेला शक्य नसेल तर तसे कळवा. अन्यथा आम्ही लोकसहभागातून करावे का? असा इशारा चौधरी यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिला आहे. नगरपरिषद परिषद प्रशासन याची काय दखल घेते याकडे लक्ष लागून आहे.