शनीपेठेतील रस्त्यांच्या कामाला होणार सुरुवात !

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रस्त्यांची कामे मनपाकडून हाती घेण्यात आली असून शनीपेठ परिसरातील रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी महापौर भारती सोनवणे, आ.राजुमामा भोळे यांच्यासह स्थानिक नगरसेवकांनी रस्त्याची पाहणी केली. अमृत आणि भुयारी गटारीच्या कामाचा आढावा घेऊन काही काम बाकी असल्यास २ दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

प्रभाग क्रमांक ५ मधील ५ गल्लीतील रस्ते तयार करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याने महापौर सौ.भारती सोनवणे, आ.सुरेश भोळे यांनी बुधवारी कामाची पाहणी केली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक विष्णू भंगाळे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, माजी उपमहापौर अनिल वाणी, माजी नगरसेवक प्रशांत पाटील, दीपक साखरे आदी उपस्थित होते. 

अमृत योजना आणि भूमिगत गटारींच्या कामासाठी शहरात खोदकाम करण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागातील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले असून मुख्य रस्त्यावरील खड्डे सुरुवातीला बुजविण्यात येणार आहे. शहरातील मुख्य रस्ते आणि काही प्रभागातील रस्त्यांची कामे देखील मंजूर करण्यात आली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. ज्या-ज्या प्रभागात अमृत योजना आणि भूमिगत गटारींचे काम पूर्ण झाले आहे त्याठिकाणी रस्त्यांचे काम सुरू करावे असे निश्चित करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक ५ मधील शनीमंदिरपासून बळीराम मंदिर रस्त्यापर्यंतच्या ५ गल्लीतील रस्ते मंजूर करण्यात आले असून तेथील अमृत आणि भुयारी गटारींचे काम देखील पूर्णत्वास आले आहे. ५ गल्लीतील रस्ते तयार करण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

अमृत, भुयारी गटारींच्या कामांचा घेतला आढावा

बुधवारी सकाळी महापौर सौ.भारती सोनवणे, आ.राजुमामा भोळे यांनी स्थानिक नगरसेवकांसह प्रभाग ५ मध्ये पाहणी केली. अमृत योजना आणि भुयारी गटारींच्या कामाचा आढावा घेत जे थोडेफार काम बाकी असेल ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ५ गल्लीतील नागरिकांशी चर्चा करून नळ कनेक्शन घेण्याचे राहिले असल्यास त्वरित कागदपत्रे सादर करून नळ कनेक्शन घेण्याचे त्यांनी सांगितले.

भुयारी गटार व्यवस्था तपासणीला सुरुवात

महापौरांनी सूचना दिल्यानंतर भुयारी गटारींचे चेंबर तपासणीला सुरुवात करण्यात आली. चेंबरमध्ये टँकरने पाणी ओतून पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होतो की नाही हे तपासण्यात आले. तसेच ज्या ठिकाणी मोठे खड्डे आहेत ते तात्काळ बुजविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

 

Protected Content