आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात सहाय्यक फौजदार महाजन देखील निलंबित !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणात पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पाठोपाठ सहकारी पोलीस कर्मचारी सहाय्यक फौजदार अशोक महाजन यांना देखील निलंबित करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मराठा समाजाच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह टिपण्णीची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी एलसीबीचे प्रमुख निरिक्षक किरणकुमार बकाले यांची मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी रात्री उशीरा बदली केली होती. दरम्यान, बुधवारी १४ सप्टेंबर रोजी दिवसभरात मराठा समाजातील मान्यवरांसह सर्वसामान्यांनी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेत बकाले यांच्या निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यात प्रामुख्याने आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवीद्रभैय्या पाटील, विनोद देशमुख आदी मान्यवरांचा समावेश होता. याबाबत एसपींकडे मागणी देखील करण्यात आली होती.

या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी किरणकुमार बकाले यांच्या निलंबानाचे आदेश काढले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार अशोक महाजन यांच्याशी बकाले यांनी घृणास्पद व निंदणीय संभाषण केले. आता सहाय्यक फौजदार अशोक महाजन यांना देखील निलंबित केले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Protected Content