वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे घेतल्यास होतात दुष्परिणाम

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे घेतल्यास दुष्परिणाम होतात. यामुळे कोणतीही औषधी मनाप्रमाणे घेऊ नये, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त विलास तासखेडकर यांनी केले.

 

वारंवार डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेत राहिल्याने त्याचे रूपांतर व्यसनात होऊन दुष्परिणाम जाणवू शकतात. तसेच एखादा उपचार वैद्यकीय सल्ल्याशिवाय मध्येच थांबवला तरी त्याचे अघटित परिणाम दिसतात. सामान्यत: ते वृद्धांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात, यामुळे कोणतीही औषधी मनाप्रमाणे घेऊ नये, असे विलास तासखेडकर यांनी सांगितले.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील औषधशास्त्र विभागातर्फे  “राष्ट्रीय औषध सतर्कता सप्ताह” निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी विद्यार्थ्यांची वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. त्यात ८ जणांनी सहभाग घेतला. परीक्षण डॉ. इम्रान तेली, डॉ. रितेश सोनवणे यांनी केले.  यानंतर दुपारी कनिष्ठ निवासी विद्यार्थ्यांसाठी सेमिनार घेण्यात आले. यामध्ये ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी  अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त विलास तासखेडकर, औषधशास्त्र विभाग प्रमुख डॉ. इमरान तेली प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सेमिनार सादर केला. यावेळी डॉ. तेली यांनी औषधांचे दुष्परिणाम झाल्यावर काय करावे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.

 

विलास तासखेडकर यांनी ‘औषधांचे दुष्परिणाम’ याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. औषधांच्या अतिवापराने किंवा अतिसेवनाने विषबाधा होऊन मृत्यूही ओढवू शकतो. बऱ्याच वेळा गरोदर स्त्रिया घेत असलेल्या औषधांचे दुष्परिणाम त्यांच्या बाळांवर होऊ शकतात. औषध योग्य मार्गाने, योग्य वेळी व दिलेल्या मात्रेने घ्यावे, असे तासखेडकर यांनी सांगितले.  कार्यक्रमासाठी औषधशास्त्र विभागाच्या डॉक्टर्स, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content