जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गिरणा पंपीग येथील ब्रिटीश कालीन जुन्या पाणी पुरवठा योजनेतील पाईप चोरी प्रकरणातील संशयित तथा महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांना उच्च न्यायालयाने अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, गिरणा पंपींग येथील ब्रिटीशकालीन पाणीपुरवठा योजनेतील जुने पाईप चोरी करून नेले जात असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात आदींसोबत तत्कालीन जळगाव महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या विरोधात देखील रामानंद नगर पोलीस ठाणे आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून सुनील महाजन हे फरार होते.
दरम्यान, सुनील महाजन यांनी अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न केला असता जिल्हा न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता. यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. खंडपीठाचे न्यायमूर्ती पेडणेकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यात ॲड. सागर चित्रे व ॲड. राजेंद्र देशमुख यांनी युक्तीवाद करतांना सुनील महाजन हे विद्यालयात मुख्याध्यापक असल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा येत असल्याने त्यांनी कार्यालयीन कामे पूर्ण करावी लागतील असे सांगितले. न्यायमूतनी त्यांचा हा युक्तीवाद मानून सुनील महाजन यांना 4 फेब्रुवारीपर्यंत अंतरीम जामीन मंजूर केला आहे. यामुळे त्यांना या प्रकरणी दिलासा मिळाला आहे. सुनील महाजन यांच्या वतीने या प्रकरणात ॲड. सागर चित्रे व ॲड. राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले.