धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। धरणगाव शहर हे तालुक्याचे मुख्यालय आहे, धरणगाव बसस्थानक हे आसपासच्या खेड्यांतील लोकांच्या दैनंदिन ये-जा आणि बाजारासाठी महत्त्वाचा ठिकाण आहे. पण या परिसरात डुकरांच्या हैदोस सुरू झाला आहे. डुकरे प्रवाशांच्या पिशव्या तोंडातून पळवून नेत आहेत, त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

धरणगाव बसस्थानक येथे प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या हातात असलेल्या बाजाराच्या पिशव्या, भाजीपाला, किराणा सामान इत्यादी घेऊन डुकरे पळत असल्याचे दिसून येते. वृद्ध नागरिकांना या डुकरांचा मागे लागून पळणे शक्य नसल्याने त्यांच्या पिशव्यांतील सामानाची नासधूस होते. गरिबांना हप्त्याने केलेला बाजार, भाजीपाला किंवा किराणा सामान नष्ट झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे जाणवते.
या समस्येबाबत बस प्रशासन अधिकारी, व्यवस्थापक (कंट्रोलर) आणि इतर कर्मचाऱ्यांकडे लक्ष वेधले गेले असले तरी त्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. स्थानिक कंट्रोलर फक्त निरीक्षणाची भूमिका घेत आहेत, पण प्रत्यक्षात कोणतीही कारवाई करीत नाहीत. नागरिक जेव्हा या समस्येबाबत जाब विचारण्यासाठी स्टँडवर जातात, तेव्हा अधिकारी त्यांना उडवाउडवी उत्तरे देऊन टाळाटाळ करतात. या सर्व समस्येमुळे नागरिकांची मागणी आहे की, बस स्टँडवरील डुकरांचा बंदोबस्त करण्यात यावा. त्यांच्या मते, या समस्येचा सहजासहजी उपाय करता येईल, पण अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे हा प्रश्न वाढत आहे. ही समस्या तातडीने सोडविण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.