राज्यातील नियम शिथील : जाणून घ्या अचूक माहिती

मुंबई प्रतिनिधी | कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने राज्यातील निर्बंध सोमवार मध्यरात्रीपासूनच शिथिल करण्यात आले आहेत. यात पर्यटनस्थळांसह उद्याने व पार्क उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सोमवारी रात्री उशिरा मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती यांनी नवी नियमावली जारी केली. त्यानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये लसीचा पहिला डोसचे प्रमाण ९०% आणि दोन्ही डोसचे प्रमाण ७०% असेल त्या जिल्ह्यांसाठी ही नियमावली लागू असेल. सुधारित नियमावलीनुसार सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्याने, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २०० लोकांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.

राज्यात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर बाधितांची संख्या झपाटयाने वाढू लागताच सरकारने नववर्षांच्या पार्श्वभूमीवर ३० डिसेंबरपासून राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू केले होते. मात्र, त्यानंतरही ओमायक्रॉनचा धोका वाढू लागताच १० जानेवारीपासून दिवसा जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली. त्याचप्रमाणे लग्नसमारंभापासून सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांमधील लोकांच्या उपस्थिती संख्येवर निर्बंध लागू करण्यात आले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील करोनाबाधितांचा आलेख घसरत आहे. करोनाच्या तिसर्‍या लाटेने सर्वोच्च शिखर बिंदू केव्हाच गाठला असून आता ही लाट उतरणीला लागल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोनच दिवसांपूर्वी जाहीर केले आहे. राज्यातील करोनास्थिती नियंत्रणात आल्याचा दावा सरकारने उच्च न्यायालयातही केला आहे. यामुळे आता नियमांमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. तर, रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंतची संचारबंदीबाबतचा निर्णय संबंधित जिल्ह्यांमधील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर सोडण्यात आला आहे.

दरम्यान, राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक जिल्ह्याचे प्रशासन हे स्थानिक स्थिती लक्षात घेऊन सुधारित नियमावली लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे.

Protected Content