
सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संपूर्ण जिल्ह्यात पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना, थोरगव्हाण गणातून रेखा संजीव पाटील या नावाची चर्चा विशेष जोर धरू लागली आहे. सामाजिक कार्य, अनुभव आणि कुटुंबातील राजकीय वारसा यामुळे त्यांचे नाव इच्छुक उमेदवारांमध्ये अग्रक्रमावर घेतले जात असून, स्थानिक पातळीवरही त्यांच्या नेतृत्वाकडे आशेने पाहिले जात आहे.
रेखा पाटील या रणगाव ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या असून त्यांनी आपल्या कार्यकाळात ग्रामविकासासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. स्थानिक समस्या ओळखून त्यावर ठोस उपाययोजना राबवणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. महिलांचे सक्षमीकरण, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आदी क्षेत्रांमध्ये त्यांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका विशेष गाजली होती.
त्यांच्या राजकीय प्रवासात आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचा पारिवारिक वारसा. त्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच नितीन पाटील यांच्या मातोश्री आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे सामाजिक जाणिवा आणि प्रशासनाचा अनुभव या दोन्ही गोष्टींचा मिलाफ आहे. गावोगाव फिरून मतदारांशी संपर्क वाढवण्यावर त्यांचा भर असून, त्यांच्या या जनसंपर्क मोहिमेमुळे त्यांचं नाव अधिक गाजत आहे.
थोरगव्हाण गणातील सध्या सुरु असलेल्या चर्चांनुसार रेखा पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यास, ती विकासाभिमुख नेतृत्वाला प्राधान्य देणाऱ्या मतदारांसाठी आकर्षण ठरेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यांच्या संयमित स्वभावामुळे आणि लोकांशी जोडलेले नाते यामुळे अनेक गावांमधून त्यांना पाठिंबा मिळत असल्याचे संकेत मिळत आहेत.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ठरणाऱ्या या गणातून रेखा पाटील यांचे नाव पुढे येत असल्याने स्थानिक राजकारणाला नवे वळण मिळू शकते. सर्वसमावेशक आणि सुशिक्षित नेतृत्व म्हणून त्यांची ओळख स्थिरावत चालली आहे. त्यांच्या संभाव्य उमेदवारीने अनेक प्रतिस्पर्ध्यांना विचारात टाकले असून, पुढील काही दिवसांत या चर्चेला अधिक अधिकृत स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता आहे.



