अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी शिवसेनेत दाखल ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश


अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी l  अमळनेर विधानसभेचे माजी आमदार आणि जिल्ह्यातील प्रभावी राजकीय व्यक्तिमत्व असलेले शिरीष हिरालाल चौधरी यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते आणि अखेर आज त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतरित्या शिवसेना पक्षात प्रवेश करून एक नवा राजकीय अध्याय सुरू केला.

या पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौधरी यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे पक्षात स्वागत केले. शिंदे यांनी चौधरी यांच्या अनुभवाचे आणि स्थानिक पातळीवरील त्यांच्या मजबूत संघटनेचे कौतुक करत, त्यांच्या आगमनामुळे शिवसेनेची ताकद उत्तर महाराष्ट्रात अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.

पक्षप्रवेश प्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना नेते प्रताप सरनाईक, तसेच इतर मंत्री आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौधरी यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनाही पक्षात स्वागत करण्यात आले. त्यांच्या प्रवेशामुळे आगामी काळात अमळनेर व परिसरात शिवसेनेची घडी अधिक बळकट होईल, अशी प्रतिक्रिया स्थानिक कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.

शिरीष चौधरी हे अमळनेर विधानसभा मतदारसंघातून पूर्वी आमदार राहिले असून त्यांनी भाजपच्या माध्यमातून राजकारणात आपला ठसा उमटवला होता. मात्र, मागील काही काळात ते पक्षापासून दूर होते आणि त्यांच्या शिवसेनेत जाण्याच्या हालचाली गुप्तपणे सुरू होत्या. अखेर त्या चर्चा खऱ्या ठरल्या आणि त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश करून आपली दिशा स्पष्ट केली.