Home Cities जळगाव जळगाव भाजपचे दोन दिवसीय पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण शिबिर 

जळगाव भाजपचे दोन दिवसीय पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण शिबिर 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरतर्फे दोन दिवसीय निवासी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण शिबिर’ाचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर २७ व २८ मे रोजी जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील बॅक वूड रिसॉर्ट येथे पार पडणार आहे. पक्ष संघटन अधिक मजबूत करणे, कार्यकर्त्यांना वैचारिक व संघटनात्मक प्रशिक्षण देणे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरविणे हा या शिबिरामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

या निवासी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन २७ मे रोजी सकाळी १० वाजता जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार राजू मामा भोळे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दोन दिवसीय या शिबिरामध्ये एकूण ११ विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रांमधून पक्ष विचारधारा, संघटन बांधणी, जनसंपर्क, निवडणूक व्यवस्थापन आणि कार्यकर्त्यांची भूमिका या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. २७ मे रोजी श्रीकांत भारती, विजय चौधरी, लक्ष्मणराव सावजी, प्रदीप पेशकार आणि रवी अनासपुरे हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तसेच २८ मे रोजी योगेश डोळे, चंद्रकांत बाविस्कर, प्रविण आलई, संजय केनेकर, आमदार संजय कुटे आणि खासदार मेधा कुलकर्णी हे विविध विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षण शिबिरात भाजप जिल्हा महानगरचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष, नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्ते असे एकूण १५५ प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख दीपक परदेशी यांनी दिली.

भाजपच्या या निवासी प्रशिक्षण शिबिराकडे आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण कार्यक्रम म्हणून पाहिले जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये संघटनात्मक ऊर्जा निर्माण करण्यासोबतच पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी हे शिबिर महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मानले जात आहे.

 


Protected Content

Play sound