टेक्नॉलॉजीच्या युगात वाचन महत्त्वाचे! रोटरी क्लबचा अनोखा उपक्रम !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे निमित्त साधून, रोटरी क्लब ऑफ जळगावने बुधवारी ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त ‘रोटरी महावाचन अभियान’ राबवून एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. गणपती नगरातील रोटरी हॉल येथे पार पडलेल्या या अभियानाला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या अभियानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यात वयाची मर्यादा नव्हती. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तरुणांनी आणि वृद्धांनी शांतपणे एकत्र बसून विविध विषयांवरील पुस्तके, आत्मचरित्रे आणि कथा वाचण्याचा अनुभव घेतला. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी देखील या उपक्रमात सहभाग घेतला त्यानंतर त्यांनी या उपक्रमाचे कौतूक करून पुस्तक वाचन करून डॉ. कलाम यांना अभिवादन केले.

क्लबचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. डॉ. कलाम यांचे वाचनावरील प्रेम आणि त्यांच्या यशात वाचनाचे असलेले महत्त्व, यातून प्रेरणा घेऊन नागरिकांनी या अभियानात भाग घेतला. सहभागी सदस्यांनी सांगितले की, एकाच वेळी अनेक लोक वाचन करत असल्याने सकारात्मक ऊर्जा आणि वाचनाची एक चांगली सवय लागण्यास मदत होते.

रोटरी क्लब ऑफ जळगाव नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असतो. ‘वाचन प्रेरणा दिनी’ राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने जळगावात वाचनाचे महत्त्व वाढविण्यास हातभार लावला आहे. या यशस्वी अभियानाबद्दल क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.