जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आपण उपकरणांचा वापर करण्यात अग्रेसर आहोत. मात्र वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होईल यासाठी फारसे प्रयत्न केलेले नाहीत, त्यामुळे आपल्याला विज्ञानाबद्दल शास्रीय ज्ञान नसल्याचे सतत जाणवते, हे बदलायचे असेल तर आपण पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. असे मत पद्मश्री. डॉ. शरद काळे यांनी व्यक्त केले.
आपल्या भोवतालच्या निसर्गातील अनेक बाबी आपले आयुष्य समृद्ध करणाऱ्या आहेत. मात्र त्यांचे संवर्धन करण्यासाठी आपण माणूस म्हणून कोणते प्रयत्न करतो, हे प्रत्येकाने स्वतःला विचारले पाहिजे असेही ते म्हणाले. दि. १६ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता ग्रंथाली, मुंबईच्या वतीने विज्ञानधारा व आरोग्ययात्रा आणि पोस्टर व पुस्तक प्रदर्शन याचा जळगाव जिल्ह्यातील शुभारंभ के.सी.ई.सोसायटीच्या ओजस्विनी कला महाविद्यालयात झाला. त्यावेळी ते बोलत होते.
विज्ञान आणि आरोग्य या विषयाची जनजागृती करण्यासाठी ग्रंथीलीच्या वतीने महाराष्ट्रभर या यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम शास्रज्ञ, विज्ञान लेखक व डॉक्टर्स यांचे मार्गदर्शन विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचेकरीता आयोजित करण्यात येते. या यात्रेच्या सुरुवातीला ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या विविध पुस्तकांचे आणि आरोग्य आणि विज्ञान या विषयावरील पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन के.सी.ई.सोसायटीचे सहसचिव अॅड.प्रविणचंद्र जंगले यांचेहस्ते करण्यात आले. तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी बोलतांना अॅड.प्रविणचंद्र जंगले यांनी ग्रंथालीने सुरू केलेल्या या यात्रेबद्दल कौतुक केले व वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी ग्रंथाली राबवत असलेले उपक्रम समाजोपयोगी आहेत असे देखील सांगीतले. तसचे ग्रंथालीचे समन्वयक श्री.महेश खरे यांनी १६ ते १८ डिसेंबर २०२३ दरम्यान होणाऱ्या उपक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी व्यासपीठावर पद्मश्री डॉ. शरद काळे, मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भारंबे, के.सी.ई.सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी श्री.शशिकांत वडोदकर, ग्रंथालीचे समन्वयक श्री. महेश खरे, ओजस्विनी कला महाविद्यालयाचे संचालक श्री.मिलन भामरे, जैन उद्योग समुहाचे श्री. जयदीप पाटील उपस्थित होते. यावेळी प्रा.चारूदत्त गोखले, श्री.शरद डोंगरे, प्रा.बी.एन.केसूर, प्राचार्य सुषमा कंची तसेच इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा.प्रसाद देसाई यांनी केले.
यानंतर स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालायच्या विद्यार्थ्यांशी विज्ञानधारा या विषयावर पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी विज्ञानावर आधारित प्रयोग सादर करून त्याची सखोल माहिती व प्रात्यक्षिके करून दाखविले. विविध पदार्थ आणि वस्तुंचा पुनर्वापर कशा पद्धतीने केला जातो, त्याची उपयुक्तता आणि परिणाम याविषयीदेखील त्यांनी प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकाचे निरसन त्यांनी केले व त्यांचे विज्ञानासंबंधीचे कुतुहल जागृत करत कचरा वापराचे नियोजन व पुनर्वापर, अन्नाची नासाडी याबाबत जागृती व शपथ दिली. यावेळी प्रा.डॉ.बी.एन.केसूर, कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.आर.बी.ठाकरे, उपप्राचार्य करूणा सपकाळे, प्रा.प्रसाद देसाई, प्रा. उमेश पाटील, प्रा.स्वाती बऱ्हाटे आदी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा.अतुल इंगळे यांनी केले. दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत शिक्षक आणि पालकांसाठी डॉ.यश वेलणकर हे शिक्षक, पालकांसाठी जीवनोत्सव या विषयावर कार्यशाळा घेणार आहेत तसेच सायं. ५ ते ७ या वेळेत जीवनशैली या विषयावर डॉ.यश वेलणकर व डॉ.मयूर मुठे हे मार्गदर्शन करणार आहेत. सदर व्याख्यानांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.