जि. प. प्राथमिक शाळा धाबे येथे पर्यावरण संरक्षण जागर

 

पारोळा, प्रतिनिधी | मार्च महिन्यात येणाऱ्या जागतिक वन्यजीव दिन, जागतिक चिमणी दिन, जागतिक वन दिन, जागतिक जल दिन, जागतिक हवामान दिन निमित्ताने विदयार्थी व ग्रामस्थांमध्ये जागृती करण्यात आली.

आज ३ मार्च जागतिक वन्यजीव दिन या निमित्ताने व पुढे विदयार्थ्यांच्या परीक्षा सुरु होत आहेत म्हणुन याच दिवशी २० मार्च जागतिक चिमणी दिन, २१ मार्च जागतिक वन दिन, २२ मार्च जागतिक जल दिन, २३ मार्च जागतिक हवामान दिन असल्याने या दिवसांचे महत्व व सध्याची पर्यावरण रक्षण, जतन व संवर्धनासाठी असलेली गरज लक्षात घेता विद्यार्थी व ग्रामस्थांसमोर विविध उपक्रम मांडुन हे दिवस शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांच्या विविध संकल्पनेतुन साजरा करण्यात आले . या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेळावे केंद्र प्रमुख जितेंद्र पवार तर प्रमुख पाहुणे म्हणुन शंकर उर्फ बापू नथ्थु कुंभार हे उपस्थित होते.  बापू कुंभार यांनी उन्हाळ्यात पाण्यावाचुन मरणारे पक्षी वाचविण्यासाठी पिण्याचे पाणी भरून ठेवण्याचे मातीचे टिकाऊ बाळगे धाबे गाव व जंगल परिसरातील शेळ्या व गुरे चारण्यासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांना उपलब्ध करून दिले. गेल्या सात वर्षापासुन मुख्याध्यापक साळुंखे यांच्या समुपदेशनाने लहान थोर सर्वांनी पक्षी मारण्याची गुलेर व गोफणचा त्याग करून संपुर्ण बंदी केली आहे हे विशेष.  विदयार्थ्यांनी सर्वात जास्त संकटग्रस्त प्राणी वाघाचे मुखवटे परीधान करून ” वाघ वाचवा ” असा संदेश व ” आम्ही आहोत राष्ट्रीय प्राणी, आज अवस्था मात्र आमची दीनवाणी, ” आम्हाला बंदुकीने नाही तर कॅमेराने शूट करा ” असे घोषवाक्यसह प्रदर्शित केला. २० मार्च चिमणी दिनानिमित्ताने चिमणीसह निसर्गातील सर्वच पक्षी महत्वाबाबत मार्गदर्शन मुख्याध्यापक साळुंखे यांनी केले.  यावेळी विदयार्थीनींनी ” चिव चिव आम्ही चिमणी, खेळु दया आम्हाला तुमच्या अंगणी ” “आम्ही तुमच्या चिऊताई , जगवा व जगु दया आम्हालाही भाई ” अशी घोष वाक्य सर्वांसमोर मांडली. २१ मार्च जागतिक वन दिन असल्याने व धाबे गांवात सर्व ग्रामस्थ जल, जंगल व जमीनीशी जास्त संबंध येणारे असल्याने वनबाबत त्यांच्यात जास्तीत जास्त जागृती होणे गरजेचे आहे. गावात शिक्षकांनी विनंतीने अगोदरच कुऱ्हाड बंदी केली आहे. मान्यवरांच्या हस्ते वनाचे प्रतिक म्हणुन झाडाच्या कुंडीतील रोपाचे जल टाकुन पूजन करण्यात आले.  “झाडे लावा – झाडे जगवा ” वन रक्षण पृथ्वी रक्षण ” अशी वन बाबत जागृती करणारी घोष वाक्य विदयार्थ्यांनी प्रदर्शित केली.  २२ मार्च जागतिक जल दिनानिमित्ताने प्रत्येकाने जलसंवर्धन करणे ही काळाची महत्त्वाची गरज आहे. जल साक्षर व्हा. पाण्याचा काटकसरीने वापर व पाण्याची बचत हाच खरा मार्ग आहे असे मार्गदर्शन केंद्र प्रमुख जितेंद्र पवार यांनी केले .विदयार्थ्यांनी ” जल है तो कल है ” पाणी आडवा – पाणी जिरवा ” अशी घोष वाक्य प्रदर्शित केली  .मान्यवरांच्या हस्ते पर्यावरणपूरक मातीच्या जलकुंभाचे म्हणजे जल पूजन करण्यात आले.  २३ मार्च जागतिक हवामान दिन यावर बोलतांना बापू कुंभार म्हणाले, माझा मंडपाच्या व्यवसायाबरोबर मातीच्या वस्तु बनविण्याचाही व्यवसाय आहे . मातीची भांडी भाजुन पक्की करावी लागतात. त्यासाठी आम्ही आवा पेटवायचो तो अगोदर गावात होता.  त्यातुन निघणारा धूर व होणारे वायु प्रदुर्शन खराब होणारे हवामान यामुळे मी तो बंद केला.  स्वयंपाकासाठी नैसर्गिक किंवा गोबर गॅसचा वापर करा, जुने टायर, तशा रबराच्या वस्तु जाळु नका.  हवामान बिघडले तर वादळवारे, उष्णता थंडीत वाढ, गारपीट, अती बर्फवृष्टी, धुके, सुनामी,  अवकाळी, दुष्काळ, पुर अशा नैसर्गिक आपत्ती निर्माण होतात.  या सर्व जागतिक दिनांचे महत्व, उपयोग व फायदे बघुन विदयार्थी व ग्रामस्थ यांनी वरील सर्व गोष्टी पाळण्याचा संकल्प केला. यावेळी  चित्रांचे प्रदर्शन व माहिती विदयार्थी व ग्रामस्थांना करुन देण्यात आली.

Protected Content